Month: December 2022

पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांना ११९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे आज (बुधवार, दि. २१ डिसेंबर २०२२) आदरांजली अर्पण करण्यात आली. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. गौतमी पवार, उपप्राचार्या डॉ. सुनीता भागवत, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल कुलकर्णी आणि मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तत्पूर्वी मएसो सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेतील सौ. विमलाबाई गरवारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य मा. विजय भालेराव, मएसोचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानिमित्ताने मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कॉमर्स असोसिएशन, इकॉनॉमिक्स असोसिएशन, बिझनेस लॅब आणि इआयएस सेलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध अभ्यासशाखांच्या अंतिम परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि मएसो कॉलेज ऑफ कॉमर्समधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गरवारे ट्रस्टच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

या वेळी आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे, गरवारे ट्रस्टचे प्रतिनिधी मा. रामदास भगत, महाविद्यालय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. देवदत्त भिशीकर, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एन.एस उमराणी, मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गौतमी पवार, मएसोचे सचिव डॉ. भरत व्हनकटे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आयबीएम इनोव्हेशन सेंटर फॉर एज्युकेशनच्या प्रोग्रॅम डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख व सल्लागार मा. संजीव मेहता या कार्यक्रमात आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

सृष्टी जगताप (टी.वाय.बी.ए.), प्रज्ञा फडतरे (टी.वाय.बी.एस्ससी.- स्टॅटिस्टीक्स), स्वराली गोगटे (टी.वाय.बी.एस्ससी. – झूलॉजी), सुरभी भावे (बी.कॉम.), सोहम करंदीकर (इ. १२ वी – सायन्स), प्राजक्ता मुजुमदार (इ. १२ वी – आर्ट्स) आणि भैरवी आपटे (इ. १२ वी – कॉमर्स) या विद्यार्थ्यांचा मा. रामदास भगत, आर्कि. मा. राजीव सहस्रबुद्धे आणि मा. देवदत्त भिशीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मभूषण डॉ. भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर प्रा. डॉ. आशा खिलारे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात चालवण्यात येणारे विविध उपक्रम, स्पर्धा आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रोत्साहन याबाबत माहिती दिली. त्यानंतर मा. रामदास भगत यांच्या हस्ते ‘इआयएस सेल’ च्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी ईशा बारगजे हीने या लोगोमागील संकल्पना विशद केली.

मा. संजीव मेहता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्योजकता आणि त्याचे महत्व समजावून सांगितले. ते म्हणाले, उद्योजक होण्याचा कोणतेही गुप्त सूत्र नाही, उद्योजक होण्यासाठी कोणतीच वेळी लवकरची नसते किंवा कधीच उशीर झालेला नसतो. उद्योगातील अपयशाची भीति कधीच बाळगू नये कारण त्यातूनच शिकायला मिळते, अकार्यक्षम व्यवस्था किंवा रचनेबद्दल मनात अस्वस्थता आणि प्रचलीत गोष्टींना आव्हान यातूनच उद्योजकता घडते. आपल्या व्यवसायाच्या क्षेत्रात आधीपासूनच असंख्य कंपन्या असल्याने आपल्याला यश मिळेल का? असा विचार कधीच करू नये. कारण नव्या संकल्पना घेऊन आलेल्या कंपन्या यशस्वी होत असल्याचे दिसते. अमेझॉनसारख्या कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसलेली कंपनी यशस्वी ठरल्याचे आपण बघतो. अस्वस्थतेतून नव्याचा शोध, कौशल्य अशा गुणांच्या आधारे यश मिळवता येते. २१ वे शतक भारताचे शतक असल्याचे जगभर मानले जाते. देशांतर्गत प्रचंड मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अर्थपुरवठा हा स्टार्टअपसमोरचा अतिशय लहानसा प्रश्न आहे. खरे आव्हान आहे ते कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचे. प्रत्येक विद्यापीठात स्टार्टअपसाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जात आहे. फार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या संधीचा लाभ घेण्याची आवश्यकता आहे.

मा. रामदास भगत यांनी आपल्या भाषणात पद्मभूषण डॉ. आबासाहेब गरवारे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. ते म्हणाले, घरातील परिस्थिती बेताची असलेल्या आबासाहेब गरवारे यांनी आपल्या अफाट कष्टातून सुरू केलेले उद्योग-व्यवसाय यशस्वी करून दाखवले. महाराष्ट्रातील अग्रगण्य उद्योगपती असा नावलौकिक मिळवला. आपल्या उद्योगातून त्यांनी जगाला प्लॅस्टिक उत्पादन उपलब्ध करून दिले. या सर्व प्रवासात त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या सहकार्यांना दिले. महात्मा गांधीजींच्या विचारातील विश्वस्ताची कल्पना वास्तवात आणली. आबासाहेब गरवारे यांनी ७५ धर्मादाय संस्थांच्या स्थापनेत पुढाकार घेतला. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रातील संस्थांना भरघोस आर्थिक पाठबळ दिले. त्यांचे चिरंजीव डॉ. शशिकांत गरवारे आणि त्यांच्या कन्या मोनिका, सरिता आणि सोनिया हे डॉ. आबासाहेब गरवारे यांचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयश्री पवार यांनी तर आभार प्रदर्शन सायली ढमढेरे यांनी केले.

सासवड, दि. १० : “ प्रदीर्घ परंपरा आणि इतिहास असलेल्या सासवडमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने वाघीरे विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाचा पाया रचला.  शिक्षणासाठी आजदेखील अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना ८ ते १० किलोमीटर लांब जावे लागते, १९०६ मध्ये वाघीरे विद्यालय सुरू करताना संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी घेतलेले कष्ट खूप मोलाचे आहेत. या शाळेने दर्जेदार शिक्षणाद्वारे उज्जवल व्यक्तिमत्वाचे असंख्य नामवंत विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थीदशेत असताना अशा या शाळेत शिकणाऱ्या मित्रांचा हेवा वाटायचा”, अशा शद्बात पुरंदर-हवेली मतदार संघाचे आमदार मा. संजय जगताप यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा गौरव केला.

म.ए.सो. वाघीरे विद्यालयातील सभागृहाचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे सभागृह असे नामकरण आमदार जगताप यांच्या हस्ते आज (शनिवार, दि. १० डिसेंबर २०२२) करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष मा. विजय कोलते यांच्या पुढाकारातून शाळेतील सभागृहाचे नामकरण करण्यात आले आहे. मा. विजय कोलते आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब भोसले, शाळेचे महामात्र श्री. सुधीर भोसले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आणि शाळेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ व्यासपीठावर उपस्थित होते.

“वाघीरे विद्यालयाचा परिसर आता व्यापारी भाग झाला आहे. त्याचा विचार करून सासवडचा विकास करण्यात येत आहे. विकास आराखड्यात वाघीरे विद्यालयासाठीच्या विस्तारित जागेची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या अपेक्षा आम्ही सासवडकर म्हणून पूर्ण करू, संस्थेने त्यादृष्टीने नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा,” असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

मा. विजय कोलते यांनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आचार्य अत्रे यांचे कर्तृत्व जगभरात पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती आपल्या भाषणात दिली. ते म्हणाले की, ब्रिटीश कवि, नाटककार, अभिनेता विल्यम शेक्सपिअर यांच्या स्ट्रॅटफोर्ड या जन्मगावी त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक ठिकाणे हेच त्यांचे स्मारक आहे. शेक्सपिअरच्या स्मारकासारखेच आचार्य अत्रे यांचे भव्यस्मारक उभारण्याचे आम्ही ठरवले आहे. ब्रिटीश असल्याने शेक्सपिअर याचे नांव जगभर झाले. मात्र, चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी असलेले आचार्य अत्रे मराठी असल्याने ते जगाला माहीत झाले नाहीत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, ग्रंथालय यांना त्यांचे नांव देण्यात आले आहे, त्यांच्या नावाने प्रतिष्ठानतर्फे विविध पुरस्कार देखील दिले जाता. मुंबईत वरळी येथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी शासनाने मुख्यमंत्री निधीतून केलेले अर्थसहाय्य आणि प्रत्येक शिक्षकांने दिलेला प्रत्येकी पाच रुपये निधी अशा माध्यमातून प्रतिष्ठानकडे मोठा निधी जमा झाला आहे. पण आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे शिक्षण ज्या शाळेत झाले त्या वाघीरे विद्यालयात त्यांच्या नावाचे एक सभागृह असणे ही खूप महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. त्याबद्दल मी प्रतिष्ठानतर्फे शाळेला आणि संस्थेला धन्यवाद देतो.

एअर मार्शल भूषण गोखले यावेळी बोलताना म्हणाले की, शक्ती आणि भक्तीचा संगम असल्याने पुरंदरचे नाव मोठे आहे. अशा गावात असलेल्या आमच्या संस्थेच्या वाघीरे विद्यालयाचा आम्हाला अभिमान आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या वैज्ञानिक संशोधनाबद्दल मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. अटल टिंकरींग लॅब सारखे जिज्ञासूवृत्ती जोपासणारे विविध उपक्रम वाढविले पाहिजेत. पुढील पिढीला जिज्ञासू बनवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांना सक्षम बनविण्यात आपले आणि देशाचे हित आहे. मा. विजय कोलते यांनी त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतार्य अत्रे यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी विनोदी विषयांवरील निबंध स्पर्धा आयोजित करावी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी त्यासाठी निश्चितच सहकार्य करेल. सर्वांचे लाडके आमदार असलेले मा. संजय जगताप पाय जमीनीवर असलेले नेते आहेत. पुरंदर परिसराचा विकास करण्याची त्यांची तळमळ पुरंदर विमानतळासाठी ते घेत असलेल्या पुढाकारातून दिसून येते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष आणि शाला समितीचे मा. अध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात वाघीरे विद्यालय आणि सासवड यांच्यातील ऋणानुबंध उलगडले. राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १६२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याबाहेर आपल्या कार्याचा विस्तार करताना १९०६ साली सासवडमध्ये शाळा सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे हाच हेतू त्यामागे होता. तेव्हापासून शाळेने दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. त्यामध्ये संस्थेप्रमाणेच सासवडमधील नागरीकांचादेखील मोठा सहभाग आहे. संस्थेने अतिशय परिश्रमपूर्वक ही शाळा सुरू केली. नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली. ही शाळा सुरू व्हावी, तिचा विस्तार व्हावा यासाठी  सासवडमधील विविध लोकांनी मदत केली. निधीसंकलन आणि लोकाश्रयातून शाळा उभी राहिली. शिक्षण संस्थेला अर्थसहाय्य देण्याचा प्रघात नसताना नगरपालिकेने शाळेला वार्षिक १५० रुपये अनुदान सुरू केले. पुढील काळात त्यात वाढ करून वार्षिक ७०० रुपये अनुदान मिळू लागले. परिणामी शाळेला चांगले मुख्याध्यापक मिळत गेले, शाळेतील संस्कारांमधून चांगले विद्यार्थी घडत गेले. या शाळेने देशाला वि. म. तारकुंडे यांच्या रुपाने सरन्यायाधीश, डॉ. राम ताकवले यांच्यासारखे तीन कुलगुरू अशी  अनेक नररत्ने दिली आहेत. चतुरस्त्र आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य अत्रे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांची आठवण राहावी यासाठी शाळेतील सभागृहाला त्यांचे नाव देण्यात येत आहे. वाघीरे विद्यालयाच्या परिसरातील प्राथमिक शाळेचे नूतनीकरण करून त्या जागेत आचार्य अत्रे यांच्या नावाने एक भव्य सभागृह उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी नगरपालिकेने सहकार्य करावे अशी आमची विनंती आहे.

ऐश्वर्या कामठे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातील ईशस्तवन आणि शेवटी वंदेमातरम सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक प्रमोद ठुबे यांनी तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक रोहिदास भारमळ यांनी केले.

म.ए.सो.‘स्वरवेध’ गायन स्पर्धा : विद्यार्थ्यांना मान्यवर कलाकारांचा सल्ला

“अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताची कास धरा, एकदा पाया पक्का झाला की कोणत्याही प्रकारचे संगीत आत्मसात करता येईल. स्पर्धेमुळे संगीतात आपली प्रगती होते आणि संगीतामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असल्याने एक चांगला माणूस घडतो, म्हणूनच सूरांचा ध्यास घ्या. त्याचबरोबरच शिक्षण देखील तितकेच महत्वाचे आहे,” असा सल्ला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील नामवंत कलाकारांनी आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) विद्यार्थी स्पर्धकांना दिला. निमित्त होते, म.ए.सो.च्या ‘स्वरवेध’ या गायन स्पर्धेचे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे म.ए.सो. कलावर्धिनी आणि म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये संस्थेच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधून निवड झालेल्या इ. ५ वी ते १२ वी मधील ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तीन गटात प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरीअममध्ये आज (बुधवार, दि. ३० नोव्हेंबर २०२२) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी तर संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी संगीतातील गुरुंचे महत्व, पालकांचा पाठिंबा, तंत्रज्ञानाचा समर्पक वापर, संगीताबरोबरच शिक्षणाचे महत्व आणि वैयक्तिक आरोग्य याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून महावीर बागवडे, शुभांगी मांडे आणि गौरी जोशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सानिया पाटणकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य सुधीर भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

दरम्यान, आज सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे हे होते.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदीताई पाटील, नियामक मंडळ सदस्या डॉ. माधवी मेहेंदळे, म.ए.सो. कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टसचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे उपस्थित होते.

स्पर्धकांना मार्गदर्शन करताना प्रियदर्शिनी कुलकर्णी म्हणाल्या की, स्पर्धा म्हटले की इर्षा, जिद्द अशा दृष्टीने विचार केला जातो. परंतु, संगीत क्षेत्रात सादरीकरण हा सांगितीक जडणघडणीचा भाग असतो. श्रोत्यांसमोर आपली कला सादर करण्यासाठीचा धिटपणा कलाकाराच्या मेहनतीमधूनच येतो. कलाकार आपल्या सादरीकरणातून श्रोत्यांपर्यंत आपली कला पोहोचवतो आणि श्रोते ती ग्रहण करतात. ही समजून घेण्याची प्रक्रिया आहे. कलाकार आणि श्रोते यांच्यात एक संवाद स्थापित होतो. हा संवाद जो कलाकार प्रभावीपणे साधू शकतो तो स्पर्धा जिंकतो. स्पर्धेत यश न मिळालेल्या कलाकारांना अधिक मेहनतीची गरज लक्षात येते.

डॉ. माधवी मेहेंदळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ‘स्वरवेध’स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.

आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांच्या हस्ते या प्रसंगी संस्थेच्या वतीने नुकत्याच सादर करण्यात आलेल्या ‘वज्रमूठ’या महानाट्याच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर https://youtu.be/96fZ033rPEM या लिंकद्वारे बघण्यासाठी ती सर्वांना उपलब्ध आहे. या महानाट्यामध्ये संस्थेच्या शाळा-महाविद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी संस्थेची स्थापना करताना आरंभीच्या वर्षांमध्ये कोणत्या अडचणींना तोंड दिले, कोणत्या प्रकारे त्यांनी त्याग केला हे या महानाट्यातून मांडण्यात आले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका प्रीति धोपाटे यांनी केले तर आदित्य देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल उपाध्ये यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नाली देशपांडे यांनी केले.

स्पर्धेच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिक्षक अजय धुमाळ यांनी केले.