Month: September 2022

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये शौर्य साहसी क्रीडा व सैन्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाते.

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे पैलू एकाच छताखाली घडविण्याचे ठिकाण म्हणजे शौर्य शिबिर होय. पहाटे साडेपाच ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी या शिबिराचा दिवस पूर्ण होतो. यामध्ये शारीरिक कसरती, बौद्धिक कार्यक्रम आणि कलाकौशल्य यांना वाव दिला जातो.

घोडेस्वारी, धनुर्विद्या, रोप मल्लखांब, स्केटिंग ऑबस्टॅकल्स, वॉल क्लाइंबिंग, योगा याच बरोबर रांगोळी, वारली पेंटिंग, विविध तज्ञांची व्याख्याने, किल्ल्यावर सहल यासारख्या कार्यक्रमांची योजना केलेली असते.

सुट्टीच्या कालावधीत आपल्या पाल्याच्या जीवनाला आकार देण्याच्या व व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने ‘शौर्य शिबिर’ हा एक उत्तम पर्याय आपल्याला उपलब्ध आहे.

आजच आपला प्रवेश निश्चित करून आपण या शिबिराचा अनुभव घ्या… !!!

‘शौर्य शिबिरा’त सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरील फॉर्म भरावा…
https://forms.gle/5ecXCDWmWsPqZyX89

स्वरावर्तन फाउंडेशन, म.ए.सो.च्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे सांगीतिक सत्कार सोहळा
पुणे : आई-वडिल, गुरूंचे आशिर्वाद, रसिकांचे प्रेम-साथ लाभल्यानंतर एका कलाकाराला या पेक्षा काय आवश्यक आहे? माझ्या पुढील वाटचालीसाठी ही शिदोरी खूप आहे; मी भाग्यवान आहे, अशा भावना किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केल्या. माझ्या शिष्यांनी संगीताचा वारसा समर्थपणे पुढे न्यावा, ही एकच इच्छा आहे. आजच्या झगमगत्या दुनियेत कलाकारीपेक्षा कारागिरीला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जाता त्यांनी साधनेची वाट धरावी आणि स्वत:बरोबरच श्रोत्यांनाही दिव्य आनंदाची अनुभूती द्यावी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार आणि त्यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त आज (रविवार, दि. 11 सप्टेंबर 2022) स्वरावर्तन फाउंडेशनच्या संचालिका, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌ यांच्यातर्फे विशेष सांगीतिक सत्कार सोहळ्याचे आयोजन म. ए. सो. ऑडिटोरिअम, मयूर कॉलनी येथे करण्यात आले होते. सत्कार सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.
पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ. अत्रे यांचा पुण्यात झालेला हा पहिलाच सांगीतिक सत्कार सोहळा होता. डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार विख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या हस्ते करण्यात आला. पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्त्रबुद्धे, डॉ. अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर मंचावर होते. सुरुवातीस आरती ठाकूर-कुंडलकर यांच्यासह पाच सुवासिनींनी डॉ. अत्रे यांचे औक्षण केले.
डॉ. अत्रे पुढे म्हणाल्या, कलेने माणसातील माणूसपण जपले आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला हवे. संगीताने माझ्या आयुष्याचे सोने केले आहे. संगीत प्रेमींच्या शुभेच्छा आणि प्रेमाने माझे मन तुडुंब भरले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मला पद्मविभूषण सन्मान मिळाला याचा आनंद आहे.
‘या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितीजावरचा, साऱ्या साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावबंधाने दरवळणारा, तिथवरची वाट अडचणीची एकाकी, वाटेवरचे दिवे फसवे-मायावी वाट रोखणारे, पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वत:चा होता एक सूर दूरच्या क्षितीजावरचा हे’ स्वरचित काव्य सादर करून डॉ. अत्रे यांनी मनोगताचा समारोप केला.
पंडित हरिप्रसाद चौरासिया म्हणाले, मी प्रभाजींच्या गायनाचा खूप जुना प्रेमी आहे. त्यांच्याप्रती माझ्या मनात खूप श्रद्धा आहे. संगीत क्षेत्रातील त्यांची मेहनत, तपस्या मी खूप जवळून पाहिली आहे. भारतीय संगीत देश-विदेशात पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. रसिकांचे प्रेम त्यांना कायम मिळत राहो. त्यांचा गौरव करण्याची जर मला संधी मिळाली तर मी त्यांना ‘भारत नवरत्न’ असा पुरस्कार देईन, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे, पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेले कलाकार बघायला मिळणे माझे सौभाग्य आहे, त्यांच्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. संगीत क्षेत्रातील गुरू-शिष्य परंपरा अखंडितपणे सुरू राहावी, पुढील पिढीला शास्त्रीय संगीत अनुभवायला मिळावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ‘तारे जमीन पर’ असा योग जुळून आला आहे. डॉ. अत्रे यांच्या सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा मान संस्थेला मिळाला हा संस्थेच्या दृष्टीने भाग्ययोग आहे.
सुरुवातीस आरती ठाकूर-कुंडलकर यांनी गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करीत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली.
मान्यवरांचा सत्कार सुयोग कुंडलकर, आरती ठाकूर-कुंडलकर, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजीव सहस्त्रबुद्धे यांनी केला. डॉ. प्रभा अत्रे यांच्या कार्याचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.
म. ए. सो.चे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, म. ए. सो.च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, बाबासाहेब शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. संतोष देशपांडे, म. ए. सो.चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकणी आदी उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यानंतर किराणा घरण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल रंगली. प्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर समर्पक साथसंगत केली.