Month: August 2022

गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात बोलताना पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के. या वेळी व्यासपीठावर (डावीकडून) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

पुणे : “ सातत्याने यश मिळत गेल्यास माणसामध्ये अहंकार निर्माण होतो पण ते टाळून आपल्यात विनम्रता निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत राहा” असा सल्ला पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त मा. श्री. सु. मु. बुक्के यांनी आज (गुरुवार, दि. २५ ऑगस्ट २०२२) येथे यशस्वी विद्यार्थ्यांना दिला.

मार्च २०२२ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्चमाध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि मएसो ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा श्री. बुक्के यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी संस्थेच्या ६ जिल्ह्यांमधील २३ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील ४३ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील आणि श्री. बाबासाहेब शिंदे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे,  सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. बुक्के आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पुढे म्हणाले की, परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांवरील जबाबदारी वाढली आहे. या यशात आता उणीव निर्माण होऊन चालणार नाही. त्यासाठी यापुढे तुम्हाला तुमच्या स्वतःशीच स्पर्धा करावी लागणार आहे. कोरोना महामारीच्या काळात जग चिंताक्रांत असताना, आपल्या अस्तित्वासाठी झगडत असताना विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अतुलनीय आहे. या विद्यार्थ्यांकडे ‘कोविड बॅच’ म्हणून नकारात्मक दृष्टिकोनातून बघणे योग्य नाही. कोरोना आपत्तीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले. “मोठेपणी मला शिक्षक व्हायचे आहे” असा निर्धार व्यक्त करणारे विद्यार्थी शिक्षकांनी घडविले आहेत. त्याचबरोबर आपल्या पाल्याला समर्थपणे साथ देणारी, पहिली शिक्षिका, न्यायाधीश असलेल्या प्रत्येक आईचा विद्यार्थ्यांच्या यशात सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षकांचे देखील अभिनंदन करायला हवे.

समारंभाच्या प्रारंभी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढाव घेतला. व्यक्तीच्या विकासामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, त्यामुळे संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कायमच प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

संस्थेच्या नियमक मंडळाच्या उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील यांनी श्री. बुक्के यांचा परिचय करून दिला.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे असते. त्यांना मिळालेले यश दिसते मात्र, त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते दिसत नाही. त्यामुळे भविष्यात कठोर परिश्रमांची तयारी ठेवा आणि आपल्या कर्तृत्वाने जगाचे नेतृत्व करण्याचे स्वप्न बघा. आपली शाळा आणि संस्था यांचे नाव उज्ज्वल होईल असे काम करा.”

संस्थेचे सचिव प्रा. डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

समारंभाचे सूत्रसंचालन वर्षदा पांढरकर यांनी केले.

पुणे, दि. १३ : संगीतातील रागरागिण्यांनी एका सूत्रात गुंफलेल्या देशाच्या सांस्कृतिक विविधतेतील एकात्मतेचे दर्शन ‘गुंजे बनकर देश राग’ या कार्यक्रमातून आज झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस् आणि मएसो कलावर्धिनी यांच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ गायिका सौ. अंजली मालकर यांचे गायन,   पन्नास विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा कार्यक्रम गायन आणि नृत्याविष्कारातून उत्तरोत्तर रंगत गेला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य डॉ. माधवी मेहेंदळे, मा. आनंद कुलकर्णी, आजीव सदस्य मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कोथरूडमधील मयूर कॉलनीतील मएसो ऑडिटोरिअममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकावून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राजस्थान, गुजराथ, सौराष्ट्र या भागात सौराष्ट्री या नावाने प्रचलित असलेला राग कालांतराने सोरट आणि नंतर देश या नावाने ओळखला जाऊ लागला. ‘भारती सृष्टीचे सौंदर्य दाविती सकल रुप’ हे वर्षभरातल्या ऋतूंचे वर्णन करणारे काव्य असो, प्रत्येक भारतीयाच्या मनात रुंजी घालणारे आणि विविध भाषांचा समावेश असलेले ‘गुंजे बन कर देश राग’ हे गाणे असो, संत कबीरांची रचना ‘चदरिया झिनी रे झिनी’ असो, प्रार्थना म्हणून गायले जाणारे ‘गगन सदन तेजोमय’ हे गीत असो किंवा होरीच्या नृत्यातून आणि ख्याल गायनातून देश राग विविध भावना आणि संस्कार घेऊन आपल्या भेटीला येतो. त्याचा अनुभव या कार्यक्रमात सादर झालेल्या गायन आणि नृत्याविष्कारातून मिळाला.

सौ. अंजली मालकर यांनी सादर केलेली बड्या ख्यालातील ‘रे मोरा मन हर लिनो’ ही रचना तसेच विरह आणि शृंगाराचा मिलाफ असलेली ‘घन गगन घन घुमड की नो’ ही छोटा ख्यालातील बंदिश देश रागाची चंचलता सांगणारी होती.

देश रागात संगीतबद्ध केलेला ‘चतरंग को गावे रसरंगत सो’ हा नारायणी कुलकर्णी या विद्यार्थिनीने गायलेला तराणा, ईशान मोडक या विद्यार्थ्याने सादर केलेले ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मन मंदिरा तेजाने’ हे गीत आणि कृष्णचैतन्य सराफ याने गायलेले ‘आवोनी पधारे म्हारे देस’ हे राजस्थानी लोकगीत तसेच सौ.श्रुती जोशी आणि विद्यार्थिनीनी गायलेले बैजुबावरा चित्रपटातील नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले ‘दूर कोई गाए धून ये सुनाए’ या गाण्याला उपस्थितांची विशेष दाद मिळाली.

पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांनी होरी नृत्यासाठीच्या बांधलेल्या बंदिशीवर प्रा. सुखदा दीक्षित तसेच प्रा. अबोली थत्ते आणि विद्यार्थिनींनी केलेले सादरीकरण गायन, वादन आणि नृत्य यांचा प्रभावी अविष्कार होता.

या कार्यक्रमात प्रा. आदित्य देशमुख यांनी तबला, हेमंत पोटफोडे यांनी तालवाद्य, श्रीमती निवेदिता मेहेंदळे यांनी पखवाज, ओंकार पाटणकर यांनी सिंथेसायझर आणि देवेंद्र देशपांडे यांनी हार्मोनिअमवर साथसंगत केली.

‘वंदे मातरम्’च्या सामुहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे निवेदन प्रा. रश्मी देव आणि ऋषिकेश करदोडे यांनी केले.

हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला मानवंदना देताना सैनिकी शाळेतील विद्यार्थिनी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण  आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

हुतात्मा कर्णिक स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करतानाआर्कि. राजीव सहस्रबुद्धे. या वेळी उपस्थित (डावीकडून) सौ. सुवर्णा कांबळे, सचिन आंबर्डेकर, इंजि. सुधीर गाडे, डॉ. भरत व्हनकटे, मा. प्रल्हाद राठी, संदीप पवार आणि मोहन शेटे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाच्या प्रकाशनावेळी (डावीकडून) संदीप पवार, आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, मोहन शेटे, इंजि. सुधीर गाडे, डॉ. भरत व्हनकटे, सौ. चित्रा नगरकर, मा. प्रल्हाद राठी

 

 

 

 

या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती देताना इतिहास अभ्यासक मोहन शेटे.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६  बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.