Month: July 2022

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘आयएमसीसी’च्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, २१ जुलै : भारत हा प्राचीन काळापासून ज्ञानाचे देवालय राहिले आहे. आता युवकांनी पुन्हा शिक्षक बनून जगभरात जावे आणि संपूर्ण जगाला सुसंस्कृत बनवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी बुधवार, दि. २० जुलै २०२२ रोजी केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आएमसीसी) या शाखेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होसबाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

म. ए. सो. चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील व उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब शिंदे, आयएमसीसीच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय खुर्जेकर, आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, उपसंचालिका डॉ. मानसी भाटे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहायक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच रा. स्व. संघाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

श्री. होसबाळे म्हणाले की, शिक्षण संस्थांमधून देशाला नवे नेतृत्व देणारे युवक – युवती पुढे येतात. त्यामुळे अशा शिक्षण संस्थांना भेटी देण्यामध्ये विशेष आनंद होतो. जगाच्या शैक्षणिक नकाशामध्ये पुण्याला एक वेगळे स्थान आहे. पुणे हे शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून पुढे आले आहे. पुण्याचे सांस्कृतिक वातावरण समृद्ध असून येथे युवक-युवती केवळ शिक्षण घेतात असे नाही तर त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने परिपूर्ण होते.

भारतातील शिक्षणाबद्दल ते म्हणाले की, भारतात शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे. जगभरातून येथे लोक येत असत. भारत हा ज्ञानाचे देवालय राहिले आहे. भारतात शिक्षण हे केवळ काही लोकांपुरते मर्यादित होते, असे म्हणणे हे विकृत इतिहासाचे उदाहरण आहे. आता नवीन शिक्षण धोरणाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत ही सुवर्णसंधी आहे.

व्यवस्थापनाच्या क्षेत्राबद्दल ते म्हणाले की, भारतीय शिक्षण संस्थांमधून फक्त नोकरी मागणारे विद्यार्थी घडता कामा नयेत. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला शिक्षक होऊन जावे लागेल. त्या लोकांनाही संस्कृती शिकवावी लागेल. आपल्या देशात दरवर्षी साडेतीन लाख विद्यार्थी व्यवस्थापनाची पदवी प्राप्त करतात. दुर्दैवाने त्यातील केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांकडे नोकरी मिळवण्याची पात्रता असते. व्यवस्थापन क्षेत्रातील लोकांना याचा विचार करावा लागेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच भारत हा व्यवस्थापन क्षेत्रातही विशेष स्थान मिळवू शकतो. तसे सामाजिक वातावरण व विविधता आपल्याकडे आहे. आपल्या व्यवस्थापन कौशल्याने आपण एक अद्भुत विश्व निर्माण करू शकतो.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविकपर भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६२ वर्षांच्या देदिप्यमान वाटचालीचा आढावा घेतला. तसेच ए. आय. सी. टी. ई. ने म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) मधील एम. सी. ए. अभ्यासक्रमाच्या एका जादा तुकडीला व एम. बी. ए. अभ्यासक्रमाच्या दोन जादा तुकड्यांना मान्यता दिल्यामुळे आय. एम. सी. सी. मध्ये आता ७२० विद्यार्थी संख्या झाली असल्याची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हा नुसताच तरुण नाही तर आकांक्षा असलेला तरुण देश आहे. त्या तरुणांच्या स्वप्नांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सर्व ते बळ देईल.

शुभदा पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.