Month: May 2022

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

‘मएसो भवन’, १२१४-१२१५, सदाशिव पेठ, पुणे ३०.

 

: होर्डिंगविषयी निविदा :

              तपशील:

  • पुण्यातील कर्वे रोड, पौड रोड, सदाशिव पेठ येथील संस्थेच्या विविध शाखांच्या आवारातील होर्डिंग्ज भाडेतत्वावर द्यावयाचे संस्थेच्या विचाराधीन आहे. संबंधित ठिकाणच्या होर्डिंग्जसाठी कंत्राटदारांकडून तीन वर्षे कालावधीकरिता निविदा मागविण्यात येत आहेत. संस्थेकडे प्राप्त झालेल्या सर्व कंत्राटदारांचे किंवा कोणा एका कंत्राटदाराचा प्रस्ताव नाकारण्याचा, होर्डिंग्जची ठिकाणे रद्द करण्याचा किंवा सदर निविदा प्रक्रिया थांबविण्याचा हक्क संस्थेने राखून ठेवला आहे.
  • होर्डिंग्जची ठिकाणे, आकार व संख्या पुढीलप्रमाणे :
अनु क्र.

होर्डिंगचे ठिकाण

होर्डिंग संख्या

आकार

स्क्वे.फूट

(W x H)

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक.

२०x २०

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीट वॉल, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा.

२०x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना.

२०x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोडकडे येताना.

४० x २०

मएसो सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना, कर्वे रोड बाजू.

२०x २०

मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार.

२०x २०

  • होर्डिंग कालावधी : ना हरकत कालावधी ३ वर्षासाठी, होर्डिंगसाठी ३ वर्ष कालावधीचा करार.
  • अटी व शर्ती:
  • होर्डिंग मंजूर झाल्यास जाहिरात फलकाच्या भाड्याची एक वर्षाची रक्कम संस्थेमध्ये आगाऊ भरावी लागेल. पहिल्या वर्षाच्या समाप्तीला दुसऱ्या वर्षाची व दुसऱ्या वर्षाच्या समाप्तीला तिसऱ्या वर्षाची भाड्याची रक्कम आगाऊ भरावी लागेल. होर्डिंग उभारण्यासाठी संस्थेकडून देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे. तसे करावे लागल्यास संस्थेकडून एक महिन्याची नोटीस दिली जाईल.
  • संस्था व होर्डिंग मंजूर झालेल्या जाहिरातदाराबरोबर योग्य तो करारनामा केला जाईल. करारनाम्यातील कलम अथवा कलमांचा भंग झाल्यास संस्थेला करार रद्द करण्याचा अधिकार राहील.
  • होर्डिंगसाठीचे स्ट्रक्चर अर्जदारानी स्वतःच्या खर्चाने उभारावयाचे आहे. त्यासाठी संस्थेच्या स्ट्रक्चरल इंजिनियरचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आपल्या खर्चाने संस्थेकडे सादर करावयाची जबाबदारी आपली राहील. स्ट्रक्चरल इंजिनियरचे प्रमाणपत्र संस्था कार्यालयाकडे प्राप्त झाल्यावरच होर्डिंगचा वापर सुरु करावयाचा आहे. होर्डिंग मजबूत असणे ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे जीवितहानी, अपघात किंवा काही अनुचित घटना घडल्यास त्या घटनेची संपूर्ण जबाबदारी आपली राहील.
  • होर्डिंग उभारताना संस्थेच्या शाखेच्या इमारतीस नुकसान पोहोचू नये याची दक्षता घ्यावी. होर्डिंग उभारताना इमारतीस नुकसान पोहोचल्यास इमारत कंत्राटदाराला स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावी लागेल. तसेच होर्डिंग उभारताना, होर्डिंग कराराच्या कालावधीत आणि होर्डिंग पूर्णतः काढेपर्यंत दुर्घटना घडून व्यक्तीस इजा इत्यादी झाल्यास आर्थिक, दिवाणी, फौजदारी स्वरुपाची किंवा अन्य कोणतीही जबाबदारी संस्थेची राहणार नाही. होर्डिंग उभारणी ते होर्डिंग काढणे या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आवश्यक त्या सर्व प्रकारचा अपघात विमा काढावा व त्याची एक प्रत संस्थेकडे माहिती म्हणून द्यावी.
  • होर्डिंगसाठीचा वीज पुरवठा संस्थेच्या शाखेमार्फत दिला जाणार नाही, त्यासाठी आपण स्वतंत्र व्यवस्था करावयाची आहे. गरजेनुसार वीज पुरवठ्यासाठी संस्थेकडून ना हरकत देता येऊ शकेल मात्र त्याचे दरमहाचे देयक भरण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील.
  • होर्डिंग ज्या कालावधीसाठी मंजूर झालेले आहे तो कालावधी संपल्यावर कंत्राटदाराने संस्थेच्या संबंधित शाखेच्या आवारातून लगेच होर्डिंग व साहित्य काढून घ्यावयाचे आहे याची नोंद घ्यावी.
  • आवश्यक त्या सर्व शासकीय आस्थापनांकडून आवश्यक परवानग्यांची पूर्तता आपण करावयाची आहे. होर्डिंगबाबत लागू असणाऱ्या सर्व कायद्यांनुसारच्या कायदेशीर बाबी व कार्यवाही पूर्ण करणे, आणि सर्व प्रकारच्या परवानग्या कंत्राटदाराने स्वतःच्या खर्चाने प्राप्त करून घेऊन संबंधित सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती संस्था कार्यालयामध्ये दाखल करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी आहे. या अनुषंगाने येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अथवा इतर जबाबदारीस संस्था जबाबदार नाही.
  • होर्डिंग मंजूर झाल्यास वर्षातून १५ दिवस संस्था सांगेल त्या दिवसांना संस्था किंवा संस्थेच्या शाखेचे जाहिरात फलक लावणे बंधनकारक राहील.
  • ‘मएसो’ ही शैक्षणिक संस्था असल्याने होर्डिंगवर जाहिरात लावताना कोणती जाहिरात दिली जाणार आहे व त्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक वातावरण बिघडवणारी किंवा आक्षेपार्ह चित्रे व मजकूर नाही इत्यादीबाबतीत कंत्राटदारास खात्री करावी लागेल व मगच होर्डिंग प्रदर्शित करावे लागेल. आक्षेपार्ह जाहिरात प्रदर्शित झाली आहे असे आढळून आल्यास जाहिरात तात्काळ काढून घ्यावी लागेल याची कंत्राटदाराने जाणीवपूर्वक नोंद घ्यावी.
  • उपरोक्त  सर्व अटीं व शर्तींमध्ये बदल करण्याचा, ऐेनवेळी नव्या अटी व शर्तीं समाविष्ट करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे.
  • संस्थेकडे प्रस्ताव देण्याची अंतिम तारीख :  बुधवार, दिनांक १५ जून २०२२ रोजी सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत संस्था कार्यालयामध्ये सीलबंद लखोट्यात (‘लखोट्यावर ‘होर्डिंगबाबत निविदा’ असे मोठ्या अक्षरात लिहून) सोबत दिलेल्या विहित नमुन्यातच संबंधितांनी प्रस्ताव सादर करावेत.

 

आपला विश्वासू,

(सचिन आंबर्डेकर)

मुख्य कार्यकारी अधिकारी,

 मएसो, पुणे ३०.

——————————————————————————

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव

प्रति,                                                                                                                             दिनांक:     /    /२०२२

मुख्य कार्यकारी अधिकारी,

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी,

‘मएसो भवन’, १२१४ – १२१५ सदाशिव पेठ, पुणे ३०.

विषय : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शाखांच्या आवारात होर्डिंग लावण्यासाठी प्रस्ताव

विहित अर्ज

प्रस्ताव देणा-या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव व पूर्ण पत्ता

(अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड जोडावे)

संपर्क क्रमांक –(लँडलाईन व भ्रमणध्वनी क्रमांक द्यावेत)
संस्था किंवा फर्म इत्यादी असल्यास नोंदणीकृत असल्याबाबतची कागदपत्रे जोडली आहेत का ? जोडली आहेत / जोडली नाहीत
पुणे महानगरपालिकेकडे नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक, नोंदणीचा दिनांक (नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची छायाप्रत सोबत जोडावी. नोंदणी केली आहे / नोंदणीकेलेली नाही
या क्षेत्रात आपणास किती वर्षाचा अनुभव आहे. अनुभव असल्यास आपल्याद्वारा शहरामध्ये सध्या चालू असलेल्या ३-४ साईटचे फोटो जोडावेत जोडली आहेत / जोडली नाहीत

होर्डिंगसाठी  कंत्राटदाराकडून प्रस्तावित करण्यात येत असलेली भाडे रक्कम :

अनु क्र.

ठिकाण

होर्डिंग संख्या आकार

(Wx H)

भाड्याची प्रती स्क्वे.फू. प्रस्तावित वार्षिक रक्कम

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

 

मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, महाविद्यालयाची पॅरापीटवॉल, आयुर्वेद रसशाळा चौक.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, सेन्ट्रल मॉल समोरील जागा.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, दाराजवळ, नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वे रोड कडे येताना.

२० x २०

मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जुन्या इमारतीवरील पॅरापीटवॉल नदीकडील बाजू, गांजवे चौकाकडून कर्वेरोड दिशेने येताना.

४० x २०

मएसो सौ विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कनजिमखाना, कर्वे रोड.

२० x २०

मएसो मुलांचे विद्यालय, सदाशिव पेठ, पुणे ३०, हत्ती गणपती बाजूकडील शाळेचे आवार.

२० x २०

मी निविदा तपशील पूर्णपणे वाचला असून मला समजला आहे तसेच निविदा तपशीलामध्ये दिलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचल्या आहेत व मला मान्य आहेत.

अर्जदाराचे नाव

स्वाक्षरी व शिक्का

दिनांक:    /    / २०२२

डॉ. एन.एस. उमराणी यांचे स्वागत करताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे  मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. भरत व्हनकटे, सचिन आंबर्डेकर, डॉ. गीता आचार्य, इंजि. सुधीर गाडे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉ. एन.एस. उमराणी यांनी आज (गुरुवार, दि. १९ मे २०२२) पुन्हा पदभार स्वीकारला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून निवड झाल्यामुळे डॉ. उमराणी यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा दिला होता. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांनी प्र-कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. काल प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर डॉ. उमराणी यांनी आज महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पुन्हा पदभार स्वीकारला.

यापूर्वी २ मे २००८ ते १७ नोव्हेंबर २०१७ या काळात डॉ. उमराणी यांनी मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे.

महाविद्यालयात आज त्यांच्या स्वागतावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. केतकी मोडक, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सौ. आनंदी पाटील आणि बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सौ. पाटील या मेकॅनिकल इंजिनिअर असून व्यवसायाने उद्योजिका आहेत. मार्च २०१७ पासून त्या मएसोच्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत. मएसो बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शाला समिती अध्यक्ष, मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या महाविद्यालय सल्लागार समितीच्या सदस्य तसेच मएसो रेणुका स्वरुप करिअर कोर्सेसच्या सल्लागार समिती सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

यापूर्वी त्यांनी पुण्यातील औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलांची), औंध, पुणे (Government ITI – Boy’s) या संस्थेच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या उपाध्यक्ष आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (मुलींची), औंध, पुणे (Government ITI – Girl’s) या संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

बाबासाहेब शिंदे हे स्वतंत्र व्यावसायिक असून पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या पिंगोरी या गावात ते ग्रामविकासाचे कार्य करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगर ग्रामविकास गतीविधीची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.

ऑक्टोबर २०१८ पासून ते मएसोच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत. मएसो वाघीरे विद्यालय, सासवड या शाळेच्या शाला समितीचे अध्यक्ष तसेच मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा आणि मएसोच्या बारामतीमधील शाळांच्या शाला समितीचे सदस्य अशी त्यांच्याकडे सध्या जबाबदारी आहे.

डॉ. माधव भट आणि सीए अभय क्षीरसागर यांनी संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदांवर सौ. आनंदी पाटील व बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सध्याच्या काळात खूप कष्ट घेतात, ते बघून शिक्षण क्षेत्रासाठी काही करावे अशी कल्पना मनात आली. त्यासंबंधात विचार करत असताना सामाजिक भान जपणाऱ्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नाव समोर आले आणि शैक्षणिक कार्यासाठी याच संस्थेला देणगी देण्याचे निश्चित केले. मी दिलेल्या देणगीतून संस्थेने अतिशय उत्तम इमारत बांधून पूर्ण केली याचा मला आनंद वाटतो. सामाजिक जबाबदारी म्हणून चांगली संस्था निवडून अनेकदा आर्थिक मदत केली. आजपर्यंत मतिमंद, वृद्ध व्यक्तिंसाठी चांगली संस्था निवडून कार्य केले. शिक्षणामुळे समाजात प्रबोधन होईल आणि समाजातील गरजू व्यक्तींचे जीवन अधिक सुसह्य होईल तसेच पत्नीची आठवण कायम राहिल अशी इच्छा मनात होती, ती आता पूर्ण झाली आहे अशा शद्बात संस्थेचे हितचिंतक व देणगीदार मा. वसंत ठकार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बांधण्यात येणाऱ्या नवीन तीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन आणि मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त गणेशपूजन असा कार्यक्रम अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आज (मंगळवार, दि. ३ मे २०२२) आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते हे दोन्ही कार्यक्रम झाले. या वेळी मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसच्या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रेक्षागृहात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात मा. वसंत ठकार बोलत होते.

यावेळी संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या शाला समितीचे अध्यक्ष आ.वा. कुलकर्णी, मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे व आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, ठकार कुटुंबिय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मएसो आयएमसीसीच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेतला. १९८३ साली २० ते ३० विद्यार्थी संख्येने सुरू झालेल्या आयएमसीसीत आज १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या इमारतीमुळे व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजा पूर्ण झाल्या असून असून येत्या २-३ वर्षात आयएमसीसीतील विद्यार्थ्यांची संख्या २००० पर्यंत पोहोचेल, अशी माहिती दिली. या वाढीत सर्वांचेच मोठे योगदान असून ही अक्षय्य ऊर्जा अशीच टिकून राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यी संघाच्या https://maa.mespune.in या संकेतस्थळावर विनाशुल्क अधिकृत सदस्यत्वासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधेचे https://maa.mespune.in/https-forms-gle-fovurzd5vhgf1ai98 उद्घाटन एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. त्यांनी स्वतः या लिंकवरील  https://forms.gle/FovuRZD5VhGf1Ai98 गुगल फॉर्म भरून आपली सदस्यत्व नोंदणी केली.

नव्या इमारतीच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, शिक्षण संस्था जितके काम करतील, तितके ते कमीच असते. ‘मएसो’ संस्थापकांचे उद्दीष्ट शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार देणे हे देखील होते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे, आम्ही मात्र सोन्यासारखी माणसे जोडतो. मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेऊन या संस्थेतून बाहेर पडतील. श्री. वसंत ठकार यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी योग्य वाटली.  मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील वातावरण कायमच आनंदी असते. अशा वातावरणात शिकलेले विद्यार्थी नावलौकीक मिळवतील. नवी पिढी सक्षम झाली तरच देश सक्षम होईल आणि देशाचा विकास होईल, त्यात जुन्या पिढीचे हितदेखील आहे.

मएसो आयएमसीसीचे संचालक डॉ. संतोष देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. बांधकाम क्षेत्रातील तज्ञांच्या योगदानाने नवी वास्तू उभी राहिली आहे, या वास्तुमध्ये सक्षम विद्यार्थी घडतील याची खात्री आहे असे ते या वेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मएसो आयएमसीसीतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अश्विनी पाटील यांनी केले.

मएसो बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमधील भूमिपूजनानिमित्त करण्यात आलेली पूजा शाळेच्या उच्च माध्यमिक विभागातील शिक्षिका सौ. कांचन मापारी व त्यांचे यजमान श्री. श्रीकांत मापारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस या शाखेच्या नवीन इमारतीतील प्रवेशानिमित्त मएसो आयएमसीसीमधील सहयोगी प्राध्यापक आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख डॉ. मानसी भाटे व त्यांचे यजमान श्री. समीर भाटे यांनी गणेशपूजन  केले.