Month: February 2022

पुणे, दि. २८ : “ जगाच्या इतिहासात आपल्या देशाची ओळख ज्ञान देणारा देश म्हणून आहे. त्यामुळे आक्रमकांनी देशातील महाविद्यालये, नालंदासारखी विद्यापीठ नष्ट केले. ब्रिटिशांनी विज्ञानाच्या आधारे आपल्या देशातील नागरिकांची मति भ्रमित केली. आपल्या देशातील ज्ञान आणि ते देणारे ग्रंथ निकृष्ट दर्जाचे ठरवले. भारतातील ज्ञान तर्कसंगत नाही, ते भ्रामक समजुती आणि अंधश्रद्धेवर आधारित आहे, हे समाजमनावर बिंबवले. हे ज्ञान देणारी भाषा संस्कृत असल्याने त्यांनी ती भाषा मृत भाषा ठरवली. सुशिक्षितांनी हे सर्व सत्य मानले. भारतीय ज्ञान परंपरेतील विषय आजही आपल्या देशात शिकवले जात नाहीत आणि गेल्या ७५ वर्षात आपण ते पुर्स्थापित करू शकलो नाही, इतका आपल्यावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे”, असे प्रतिपादन विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी आज येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे ‘स्वराज्य – ७५: स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दुसरे पुष्प गुंफताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे बोलत होते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाचा विषय होता, ‘भारताचा स्वातंत्र्य लढा व विज्ञान’. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीपजी नाईक होते.

म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस आणि म.ए.सो. सिनीअर कॉलेज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक होते. या वेळी व्यासपीठावर म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट मा. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेच्या ‘स्वराज्य – ७५ समिती’ च्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसचे संचालक डॉ. संतोष कुलकर्णी, म.ए.सो. सिनीअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे उपस्थित होते.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून मर्यादित निमंत्रितांच्या उपस्थितीत मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरिअममध्ये हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संस्थेच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनेलद्वारे त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

या वेळी बोलताना मा. जयंतराव सहस्रबुद्धे यांनी पुढे सांगितले की, भारतातील थोर वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी आपले शोधकार्य २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रसिद्ध केले म्हणून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळणार असा त्यांना आत्मविश्वास होता, त्यामुळे त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्विडनमध्ये जाण्याकरिता जहाजाचे टिकट देखील काढले होते. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे १९३० साली त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. तो स्वीकारताना रमण यांनी हा पुरस्कार स्वतंत्र देशाच्या ध्वजाखाली स्वीकारू शकत नसल्याचे शल्य व्यक्त केले. तसेच तो पुरस्कार देशाच्या स्वातंत्र्य योद्ध्यांना समर्पित केला.  चंद्रशेखर व्यंकटरमण हे केवळ वैज्ञानिक नव्हते तर ते स्वातंत्र्य योद्धेदेखील होते, याकडे दुर्लक्ष होते. भारतीय विज्ञानाची किर्तीपताका जगासमोर नेणाऱ्यांची नावे, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी योगदान दिलेल्या विज्ञान क्षेत्रातील व्यक्तींची नावे जगासमोर येत नाहीत. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करताना ५ सूत्रे समोर ठेवली आहेत… १. स्वातंत्र्य चळवळ, २. नवनवीन कल्पना, ३. उपलब्धी किंवा यश, ४. वर्तमान व भविष्याची योग्य दिशेने वाटचाल आणि ५. समृद्ध भविष्य घडविण्याचा संकल्प. यातील पहिल्या सूत्राचे योग्यप्रकारे आकलन करून घेतल्याशिवाय अन्य सूत्रांची निश्चित दिशा समजणार नाही. देशाच्या स्वातंत्र चळवळीचे आकलन करून घेताना हे लक्षात येते की, आक्रमकांचा उद्देश हा नेहमीच प्रदेश जिंकणे आणि तेथील संस्कृती नष्ट करणे होता. त्यातून आत्मगौरव आणि आत्मविश्वास नाहीसा होतो आणि ज्येत्याचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती निर्माण होते. देशाची अस्मिता आणि ‘स्व’ संपवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. ब्रिटिशांनी केलेले आक्रमण वेगळ्या स्वरुपाचे होते. ते का यशस्वी झाले? देशाची ओळख नष्ट करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते साधन होते?  याचा विचार केला तर लक्षात येते की ब्रिटिशांनी विज्ञानाच्या सहाय्याने आपली मति भ्रमित केली. रेल्वे, तार खाते, ॲलोपॅथी याबरोबरच त्यांनी पहिल्या औद्योगिक क्रांतीमुळे उभ्या राहिलेल्या कारखान्यांच्या भांडवलाची आणि कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी, आपल्या देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियासारख्या विविध सर्वेक्षण संस्था निर्माण केल्या, जंगलात राहणाऱ्या लोकांना जंगलापासून दूर करण्यासाठी जंगल कायदा निर्माण केला. आज आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत,  पण ब्रिटिशांनी १९० वर्षांच्या राजवटीत त्याच्या ९ पट म्हणजे ४५ ट्रिलियन डॉलर इतकी भारताची लूट केली. होमिओपॅथी ही तर्कशुद्ध उपचार पद्धती शत्रूराष्ट्र असलेल्या जर्मनीमध्ये विकसित झाली असल्याने ब्रिटिशांनी ते छद्मविज्ञान ठरवले. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कलकत्ता मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेले महेंद्रलाल सरकार यांनी जेव्हा होमिओपॅथीचा पुरस्कार केला तेव्हा त्यांच्यावर सरकारी बहिष्कार घालण्यात आला. त्यानंतर महेंद्रलाल सरकार यांनी भारतीय विज्ञानाचे पुनर्रुज्जीवन करण्यासाठी कलकत्ता मेडिकल जर्नल सुरू केले. स्वदेशी भावनेचा अविष्कार करण्यासाठी समाजाच्या सहयोगाने इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केली. पूर्णपणे स्वदेशी आणि निव्वळ राष्ट्रीय ध्येयाने सुरू झालेल्या या संस्थेमुळे विज्ञान क्षेत्रात स्वदेशी चळवळीचा उदय झाला आणि या संस्थेतून देशभक्त शास्त्रज्ञ तयार झाले. चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी देखील याच संस्थेत संशोधन कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्याला लढा हा केवळ राजकीय नव्हता तर विज्ञानाच्या क्षेत्रातदेखील तो तितक्याच प्रखरतेने लढला गेला. स्वतंत्र भारत हा संशोधन करून ज्ञान निर्माण करेल त्यासाठी शास्त्रज्ञांनी दिलेली दिशा समजून घेतली पाहिजे.

संस्थेचे उपाध्यक्ष मा. प्रदीप नाईक आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशाची मानसिकता, परंपरा, आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याची गरज आहे. भूतकाळातील न्यायावर मात करून भविष्यात कोणी आपल्या देशाची लूट करू शकणार नाही असे सामर्थ्य निर्माण करण्याची आवश्यकता आहे.  आत्मनिर्भर, जगाला दिशा दाखविणारा भारत निर्माण करण्याचा संकल्प युवा पिढीने करावा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन म. ए. सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेसमधील सहाय्यक प्राध्यापक डॉ. पूनम वाठारकर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे सादर करत आहे

कथामाला

सादरकर्ते : म. ए.सो.भावे प्राथमिक शाळा, पुणे

🪔🪔🪔🪔🪔🪔

📣 कथा- नवनिर्मिती विज्ञानक्षेत्रातील ! – डॉ. महेंद्रलाल सरकार यांचे योगदान

🖌️लेखन-जयंत सहस्त्रबुद्धे

🎤वाचक स्वर- रेणुका महाजन

https://youtu.be/WP3xRatF4rQ 

म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळाली स्वायत्तता

छायाचित्रात (डावीकडून) : संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे, संस्थेच्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीवजी सहस्रबुद्धे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव आणि संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि समाज यांच्यातील ऋणानुबंध अधिक बळकट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, जागतिक आव्हान ठरलेल्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत केलेली सेवाभावी उपक्रमांचे आयोजन, संस्थेची १६० वर्षांची दैदिप्यमान वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाचे मा. उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालेले प्रकाशन आणि या ग्रंथाची पहिली प्रत मा. राष्ट्रपतींना सादर करण्याचा अभिमानास्पद क्षण अशा विविध आनंददायी आणि प्रेरणादायी प्रसंगांनी संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे झाले. इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आज (सोमवार, दि. १४ फेब्रुवारी २०२२) पत्रकार परिषदेत दिली. म. ए. सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला नुकतीच मिळालेली स्वायत्तता हा संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक मैलाचा दगड आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षांची सांगता आणि म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला मिळालेली स्वायत्तता या निमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, पदाधिकारी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

दि. १९ नोव्हेंबर २०१९ ते १९ नोव्हेंबर २०२० हे संस्थेचे शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष होते. देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मा. राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी,  मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवला होता.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६० व्या) वर्षातील पदार्पणाचे औचित्य साधून संस्थापकांच्या मूळ छायाचित्रांवरून काढलेली तैलचित्रे तयार करून घेण्यात आली आणि संस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी चित्रशिल्प बसविण्यात आले. संस्थेच्या लोगोमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या. संस्थेच्या कार्याची माहिती सर्वदूर पोहोचावी यासाठी मराठी आणि इंग्रजी भाषेतील माहितीपट आणि माहिती पुस्तिका तयार करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी यावेळी दिली.

१६० व्या वर्षाचा प्रारंभ अभिवादन यात्रेने करण्यात आला. संस्थेच्या पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी असे सुमारे २५०० जण त्यात सहभागी झाले होते. गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर संस्थेच्या माजी विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि हितचिंतकांच्या स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.

गरवारे महाविद्यालयाच्या आवारातील वर्तुळाकार इमारतीचे वाढीव बांधकाम पूर्ण करण्यात आले. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी इमारतीचे भूमीपूजन करून तिचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. संस्थेच्या मयूर कॉलनीतील आवारात म.ए.सो. आय.एम.सी.सी. या शाखेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याचे बांधकाम करण्यात आले. तसेच याच आवारात  बांधण्यात येणाऱ्या एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठीच्या नव्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले. या इमारतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले असून ही ऐतिहासिक वास्तू आता अधिक दिमाखदार दिसत आहे.

संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘व्यक्तिमत्व आणि करियर यातून देशसेवा’ या विषयावर माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांचे, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचे तर ‘माझे ईशान्य भारतातील अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्री. सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

इ. १० वी आणि इ. १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या विषयावर ‘वेबिनार सिरीज’ची सुरवात करण्यात आली.

कोविड महामारीच्या काळात सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून संस्थेने निधी संकलन, रक्तदान शिबिरे, गरजू व्यक्तींना धान्य वाटप, रुग्णांच्या विलगीकरणासाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले विलगीकरण केंद्र, लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे, रुग्णालयात विशेष कोविड कक्षाची उभारणी, प्रबोधनपर ध्वनिचित्रफितीची निर्मिती इत्यादी अनेक उपक्रम राबविण्यात आले.  सर्वसामान्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विनिंग स्ट्रॅटेजिज इन कोविड वॉर’ या विषयावर डॉ. धनंजय केळकर यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्री मा. श्री. नितीन जी गडकरी यांचे व्याख्यान मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२० रोजी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश जी पोखरियाल ‘निशंक’ यांचे व्याख्यान बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आले होते. कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन ही दोन्ही व्याख्याने ऑनलाईन माध्यमाद्वारे आयोजित करण्यात आली होती.

“भविष्यातील आपला देश घडवण्यासाठी आवश्यक असलेली दिशा आपल्या देशाला द्यायची आहे, तेच काम महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करत आहे,” अशा शद्बात मा. नितीनजी गडकरी यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. डॉ. रमेशजी पोखरियाल ‘निशंक’ आपल्या व्याख्यानात म्हणाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसारख्या बहुमुखी आणि बहुआयामी संस्था राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आधारस्तंभ ठरतील.

‘ध्यास पंथे चालता…’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाने संस्थेच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाची सांगता करण्यात आली, अशी माहिती मा. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

म.ए.सो.च्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दहा वर्षांसाठी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळाला आहे. म.ए.सो. अंतर्गत स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेले हे दुसरे महाविद्यालय आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे यावेळी बोलताना म्हणाले की, १९४५ साली स्थापन झालेल्या मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये आता २५ पदवीधर शिक्षण विभाग आहेत ज्यामध्ये  १८ पदव्युत्तर आणि सावित्रीबाई  फुले  पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त विज्ञान आणि कला विद्याशाखेतील ०७ संशोधन केंद्रे आहेत. महाविद्यालयात ५० पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवले जातात. महाविद्यालयाला तीन वेळा NAAC द्वारे प्रमाणित करण्यात आले आहे. चालू वर्षात  वरिष्ठ महाविद्यालयातील सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात  अद्ययावत वर्ग आणि  प्रयोगशाळा  आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय  आणि क्रीडाविषयक पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत. महाविद्यालयात अनेक विद्यार्थीकेंद्रित उपक्रमही राबवले जातात.

ऑगस्ट २०२० मध्ये महाविद्यालयाने स्वायत्त दर्जा मिळवण्याचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर केला होता. कोविडच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर २०२१ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणीनंतर, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा देण्याची शिफारस केली.

नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन स्वायत्ततेत कौशल्य आधारित शिक्षणावर भर देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याची महाविद्यालयाची इच्छा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक अभ्यासक्रमांद्वारे ज्ञान मिळू शकेल तसेच त्यांची रोजगारक्षमताही वाढेल. स्वायत्ततेअंतर्गत, भविष्यात व्यापक संधी असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचा महाविद्यालयाचा प्रस्ताव आहे. डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच नॅनोसायन्सेस आणि नॅनोटेक्नॉलॉजी यासारख्या विषयांमध्ये नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. नवीन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज आणि सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स सुरू करण्याचीही महाविद्यालयाची इच्छा आहे. चांगले नेते आणि प्रशासक विकसित करण्यासाठी आणि जागतिक समस्यांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभ्यासक्रम विकसित करण्याची योजना आहे.

या वेळी मान्यवरांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले आणि मान्यवरांचा परिचय करून दिला.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ सादर भेट देताना संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे. या वेळी छायाचित्रात (डावीकडून) ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे आणि सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे

भारताचे मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास ग्रंथ ‘ध्यास पंथे चालता … ‘ आज (गुरूवार, दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये सादर भेट देण्यात आला.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींचा याप्रसंगी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

मा. राष्ट्रपतींनी त्यांच्या पुणे भेटीत प्रकाशनानंतर हा ग्रंथ वाचण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही भेट झाली. याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी ग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. हा ग्रंथ हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांत अनुवादित व्हावा जेणेकरून ‘मएसो’च्या वाटचालीची माहिती अखिल भारतीय स्तरावर पोहचेल आणि सर्वांना प्रेरणा मिळेल अशी सूचना केली. याप्रसंगी त्यांनी ग्रंथारंभीच्या पृष्ठावरील काव्यपंक्तीचा अर्थ समजून घेतला. ध्येयनिष्ठा व्यक्त करणाऱ्या या पंक्ती प्रेरणादायक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील ‘मएसो’सारख्या संस्थांनी देशाला मार्ग दाखवला आहे, असे ते म्हणाले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी यावेळी मा. राष्ट्रपतींना ग्रंथाबद्दल माहिती दिली. संपूर्णपणे भारतीयांनी स्थापन केलेली आणि आजही वर्धिष्णू असलेली अशी संस्थेची वाटचाल ग्रंथातून उलगडली आहे, असे डॉ. मोडक यांनी सांगितले. संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेने वंचित घटकांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. सुरवातीच्या काळात अनेक भाषांचे शिक्षण, आधुनिक शिक्षण ही संस्थेची वैशिष्ट्ये इतिहासात दिसून येतात असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले. संस्थेने १८९६ मध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र कॉलेजची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इंग्लंडच्या संसदेत दखल घेतली गेली. पण स्वातंत्र्याच्या मागणीसाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विद्रोही भाषणे केल्याने हे महाविद्यालय ब्रिटिशांच्या रोषाला पात्र झाले. त्यामुळे हे महाविद्यालय बंद पडले.‌ महाराष्ट्र नावाची स्मृती ठेवण्यासाठी संस्थेचे नाव बदलून १९२२ मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी करण्यात आले.

स्वतःच्या पत्नीला सैनिकी शिक्षण देणारे संस्थापक वासुदेव बळवंत फडके यांचा महिला सक्षमीकरणाचा वारसा संस्थेच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेच्या माध्यमातून पुढे चालवला जात असून शाळेच्या १५ विद्यार्थिनी सैन्यदलात अधिकारपदावर कर्तव्य बजावत आहेत, ही माहिती श्री. राजीवजी सहस्रबुद्धे यांनी मा. राष्ट्रपतींना दिली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहसचिव इंजि. सुधीर गाडे उपस्थित होते.

संस्थापक वामन प्रभाकर भावे यांना ब्रिटिश सत्तेने नाकारलेले अनुदान मिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. त्यांचा गौरव भारताचे प्रथम नागरिक असलेल्या मा. राष्ट्रपतींनी संस्थेच्या इतिहासाची दखल घेतल्याने झाला असे मत सुधीर गाडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी मा. राष्ट्रपतींनी आपुलकीने सर्वांची विचारपूस केली. तसेच अगत्याने राष्ट्रपती भवन दाखवण्याची व्यवस्था केली.

संस्थेच्या वाटचालीची दखल मा. राष्ट्रपतींनी घेतल्याचा हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा प्रसंग संस्थेच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

छायाचित्रात (डावीकडून) : ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक, ‘मएसो’चे सचिव डॉ. भरत व्हनकटे, मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे.

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची १६० वर्षांची ऐतिहासिक वाटचाल मांडणाऱ्या ‘ध्यास पंथे चालता …’ या इतिहास ग्रंथाचे प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा ग्रंथ सिद्ध केल्याबद्दल मी संस्थेचे अभिनंदन करतो. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासूनची वाटचाल जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भ म्हणून वाचकांना अतिशय उपयोगी ठरणार आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या महान व्यक्तीने अन्य सहकाऱ्यांबरोबर १८६० मध्ये स्थापन केलेली पुण्यातील ही पहिली खासगी शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेमागे युवावर्गाला शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन चारित्र्य निर्माणाबरोबरच त्यांच्यासमोर आदर्श ठेवण्याचे उदात्त ध्येय होते. जनतेमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न होता. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीप्रमाणेच परमहंस मंडळी, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज अशा संस्थादेखील कार्यरत होत्या. अशा सर्व संस्थांमुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीला लागली आणि देशातील स्वातंत्र्य सैनिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रबळ झाली. भारतीय पुनरुस्थानाच्या कालखंडात असे नेतृत्व आणि संस्था निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्य संग्रामाची वैचारिक बैठक तयार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महादेव गोविंद रानडे, वासुदेव बळवंत फडके यांच्यासारख्या देशभक्तांचा विसर पडून चालणार नाही,” असे प्रतिपादन देशाचे मा. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत बोलताना केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा आणि ‘ध्यास पंथे चालता…’ या संस्थेच्या इतिहास ग्रंथाचा प्रकाशन समारंभ देशाचे माननीय उपराष्ट्रपती श्री.  एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवार, दि. ८ फेब्रुवारी २०२२ रोजी) राजधानी दिल्ली येथे उपराष्ट्रपती निवासात संपन्न झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे तसेच ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक राजधानी दिल्लीत उपराष्ट्रपती निवासात उपस्थित होते.

ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे पुण्यातून सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि श्री. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित संख्येने निमंत्रित पुण्यातील मएसो ऑडिटोरीअममध्ये उपस्थित होते.

दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले.

ग्रंथाच्या लेखिका डॉ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या इतिहास लेखनामागील प्रेरणा, भूमिका आणि लेखनासाठी केलेले संशोधन कार्य याबद्दल माहिती दिली.

संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे यांनी आभार प्रदर्शन केले.

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.