Month: October 2021

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शताद्बी वर्षातील पदार्पणानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी व ज्येष्ठ उद्योगपती पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी लिहिलेला लेख शुक्रवार, दि. २२ ऑक्टोबर २०२१ रोजी दै. सकाळच्या पुणे टुडे पुरवणीच्या पान क्र. ८ वर प्रकाशित झाला.

पुणे, दि. २२ : “इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यकच आहे परंतु, मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. मातृभाषेतील शिक्षणामुळे विविध विषयांतील संकल्पना स्पष्ट होतात, अभिजात साहित्याची आवड निर्माण होते, त्यामुळे इ. ७ वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे,” अशी अपेक्षा जेष्ठ उद्योगपती व शाळेचे माजी विद्यार्थी पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी आज येथे व्यक्त केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर, भांडारकर रस्ता या शाळेच्या शताद्बी महोत्सवाचे उद्घाटन फिरोदिया यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शाळेचे माजी विद्यार्थी आणि ‘मएसो’चे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे व प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाच्या सदस्या व शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, शाळेचे महामात्र सुधीर भोसले, शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे व शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी फाळके व्यासपीठावर उपस्थित होते.

“मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांच्याही पुढे जाण्याचा निश्चय केला पाहिजे. आपल्यामध्ये कष्ट करण्याची तयारी आहे आणि पुढे जाण्याची क्षमता आहे हे समजून घेतले पाहिजे. लहान गावांमधील आणि ग्रामीण भागातील मुलांनीच क्रिकेट विश्वात भारतीय संघाच्या विजयाची परंपरा निर्माण केलेली आपल्याला दिसते. त्यापूर्वी आपला संघ सामना अनिर्णित राखण्यातच धन्यता मानायचा. आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. आपल्या नेत्यांनी स्वप्न बघायची, त्यांनीच ती पूर्ण करायची आणि आपण केवळ त्यांचे अनुसरण करायचे असा काळ आता राहिला नाही. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित ठरवून ते साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने शाळेतील एका विद्यार्थ्याची जबाबदारी स्वीकारून आपल्याकडे असलेल्या ज्ञान-कौशल्यात त्याला पारंगत करावे, हीच शालामातेची खरी सेवा ठरेल आणि शाळेचे ऋण फेडल्याचे समाधानदेखील लाभेल,” असेही फिरोदिया यावेळी म्हणाले.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “पारतंत्र्याच्या काळात १६१ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा भर हा प्रामुख्याने शालेय शिक्षणावरच होता. लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचा प्रभाव वाढत असतानाच संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आदी प्रभुतींनी मातृभाषेतून राष्ट्रीय शिक्षण देण्याची दूरदृष्टी दाखवली. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. विविध भाषा शिकताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा होतो. प्राथमिक शाळेत शिकवले जाणारे श्लोक, पाढे यांचे पाठांतर जीवनात व्यावहारिकदृष्ट्यादेखील उपयोगी ठरते. बालशिक्षण मंदिर शाळा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना घडवण्यात यशस्वी ठरली आहे. चांगल्या शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपले प्रतिबिंब दिसते, त्यामुळे त्याला घडवण्यासाठी शिक्षक भरपूर कष्ट घेतो हे लक्षात ठेवून शिक्षकांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत. लहान मुलांमध्ये जिद्द निर्माण करू शकलो तरच आपली भावी पिढी व पर्यायाने आपला देश समर्थ बनेल आणि आज आपल्याला त्याचीच गरज आहे.”

शाला समितीच्या अध्यक्षा सौ. आनंदी पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शताद्बी वर्षात शाळेमध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळेचे हितचिंतक, माजी विद्यार्थी अशा सर्व घटकांना सामावून घेणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. परदेशातून येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व त्यांची तीन तासांची शाळा, तिळगूळ समारंभ, निबंध स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवा चेतना दिनी विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण, याशिवाय संगीत रजनी, शिवचरित्र व्याख्यानमाला, आकाशदर्शन, दंतचिकित्सा अशा विविध कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे.

कार्यक्रमात सुरवातील शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. भक्ती दातार यांनी स्वरचित स्वागतगीत सादर केले.

शाळेचे महामात्र सुधीर भोसले यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी आभार प्रदर्शन तर शिक्षिका मंजुश्री गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.