Month: July 2021

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पेरुगेट भावे स्कूलचे (आताची म.ए.सो. मुलांचे विद्यालय) माजी विद्यार्थी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बळवंतराव मोरेश्वरराव उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांनी आज वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत (इ.१० वी) महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Virtual unveiling of Rani Lakshmi Bai Statue located at RLMSS at the hands of Chief of the Army Staff of the Indian Army General Manoj Mukund Narwane on 13th July, 2021

 

“महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आहे.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.