Month: April 2021

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी जगदीश राजाराम मालखरे यांचे आज संध्याकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
१९९५ पासून त्यांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयात विविध पदांवर काम केले.
मूळचे सोलापूरचे असलेले मालखरे १९८४ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. त्यानंतर १९८७ ते १९९२ पर्यंत त्यांनी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केले. या काळात नाशिक शहर, नाशिक विभाग आणि मध्य मुंबईचे संघटन मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्याकडे परिषदेचे प्रदेश कार्यालय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. अभिनव आणि धाडसी कार्यक्रमांची आखणी करून ते यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. ते उत्तम गीत गायक होते. शांत स्वभावाच्या मालखरे यांचे अनेकांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते.
संस्थेतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य आणि जुन्या पिढीतील बांधकाम व्यावसायिक अनंत नारायण तथा दादा गोगटे यांचे काल रात्री कोरोना विषाणूच्या संसर्गाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माजी सनदी अधिकारी व चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी हे त्यांचे जावई आहेत.

गोगटे हे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेच्या नियामक परिषदेचे व पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात ४ विद्यार्थिनी आणि १३ विद्यार्थी अशा एकूण १७ जणांनी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य व इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संतोष देशपांडे.

कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आज (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) संयुक्तपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिरात महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ देत आहेत.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने रक्तदानासाठीचे सर्व निकष पूर्ण करू शकणाऱ्या जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

छायाचित्रात (डावीकडून) – म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे उपप्राचार्य सीए (डॉ.) सुदाम धोंगटे पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गीता आचार्य, मएसोच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, संस्थेचे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद लेले.

 

पुणे, दि. १९ : कोरोना साथीमुळे ‌सध्या पुणे शहरामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन म.ए.सो. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने आज (सोमवार, दि. १९ एप्रिल २०२१) महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) पी.बी. बुचडे, डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक वाणी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. नितीन आडे, युथ रेडक्रॉसचे प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्रसेनेच्या भूदल विभाग प्रमुख प्रा. प्रवीण दुसाने, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नौदल विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश शेलार, महाविद्यालयाचे प्रबंधक किसन साबळे यांचा शिबिराच्या आयोजनात विशेष सहभाग होता.

महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी या वेळी रक्तदान केले.

रक्तदाब, मधुमेह असलेल्या आणि कोरोनाचा संसर्ग झालेल्या ५५ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या ५५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे, रक्तदाब व मधुमेह नसलेल्या ५० पेक्षा जास्त वयोगटातील महिलांनीच रक्तदान करावे, कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या प्लाझ्मा दात्यांनी सध्या रक्तदान करू नये, कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींनी एक महिन्यानंतरच रक्तदान करावे अशी माहिती डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. शैलजा पारगांवकर यांनी या वेळी दिली.

सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असल्याने वरील सर्व सूचनांचे पालन करून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होते. कोरोनाची महामारी सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आणि सद्यस्थिती यामध्ये असलेला हा मोठा फरक लक्षात घेण्याची गरज आहे.

म. ए. सो. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स आणि म.ए.सो  कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय यांनी संयुक्तपणे उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. म. ए. सो. गरवारे कॉलेज असेंब्ली हॉलमध्ये सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हे शिबिर होणार आहे.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करीअर कोर्सेसमध्ये देखील उद्या (मंगळवार, दि. २० एप्रिल २०२१) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहकार्याने सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सतीश कुलकर्णी व सामंत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या रामायणावर आधारित दिनदर्शिका आणि बालगोपाळांसाठीच्या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन आज (मंगळवार, दि. १३ एप्रिल २०२१) करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उद्योजक मा. सतीश कुलकर्णी, सुमित्र माडगूळकर, रवींद्र खरे आणि ‘मएसो’चे सहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे यावेळी उपस्थित होते.

या ध्वनिचित्रफितीचे संहिता लेखन सौ. प्राजक्ता माडगूळकर यांनी केले असून निवेदन कु. पलोमा माडगूळकर यांनी केले आहे. रवींद्र खरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अमेय घाटपांडे आणि मंथन टन्नू यांनी तांत्रिक बाजू सांभाळली असून या ध्वनिचित्रफितीचे ध्वनीमुद्रण म.ए.सो. स्टुडिओमध्ये करण्यात आले आहे.

प्रभू रामचंद्रांचे आदर्श जीवन कायम नजरेसमोर राहावे या हेतून ही दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यात आली असून हा प्रकल्प दोन महिन्यात साकारण्यात आल्याचे इंजि. सुधीर गाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मा. सतीश कुलकर्णी यावेळी म्हणाले, “सातारा जिल्ह्यातील किन्हई या आमच्या गावी १९३५ च्या सुमारास माडगूळकर कुटूंब राहात होते. गावातील राम मंदिरातच ग.दि. माडगूळकर यांना गीत रामायणची प्रेरणा मिळाली असावी. अध्योद्धेचे राममंदिर, राम, महाराष्ट्र, आमचे गाव, ग.दि.माडगूळकर, गीत रामायण हे सगळं कसे जुळवून आणता येईल याचा गेल्या चार वर्षांपासून विचार सुरू होता. रामायणातील प्रसंगांवर आधारित चित्रे उपलब्ध होत नसल्याने हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता मात्र सुधीर गाडे यांच्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राकडून ही चित्रे उपलब्ध झाली आणि प्रकल्प साकारला. या कामी माडगूळकर कुटुंबाची देखील मदत मिळाली.  रामायणातून आपण बरेच काही शिकू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे काय? हे जगभरातील लोकांनी समजून घेतले पाहिजे. रामायण आणि महाभारतातून अनेक गोष्टी शिकाया मिळतात. पुत्रमोहाने कोणती परिस्थिती ओढवते? हे रामायणात कैकेयी आणि भरत तसेच महाभारतात धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांच्यावरून दिसते. जे आपले नाही ते बळजबरीने आपण मिळवले तर त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात हे आपल्याला रावणाने केलेले सीतेचे अपहरण आणि कौरवांनी कपटाने बळकावलेले पांडवांचे राज्य या उदाहरणांवरून दिसून येते. भारतात आजही या गोष्टी लागू पडतात.”

ग.दि. माडगूळकर यांचे नातू सुमित्र माडगूळकर म्हणाले, “ज्यांना वाचता येत नाही किंवा मराठी भाषा कळत नाही अशा ३ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार केल्याबद्दल आणि त्यात माडगूळकर कुटुंबीयांना सहभागी करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानतो. पुढच्या पिढीपर्यंत हे सर्व पोहोचावे हा त्यामागील उद्देश आहे. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या माध्यमातून पुण्यात गदिमांचे स्मारक उभे राहात आहे. त्यातील एक दालन गीत रामायणासाठी राखीव असेल. अयोद्धेतील राममंदिराची एक तरी भिंत गदिमांच्या गीत रामायणाने भरलेली नक्कीच असेल.”

ध्वनिचित्रफितीचे पार्श्वसंगीतकार रवींद्र खरे म्हणाले की, “वाल्मिकी रामायण हा कलात्मकतेने मांडलेला इतिहास आहे. कलात्मकतेमुळे इतिहास दीर्घकाळ टिकतो आणि सर्वदूर त्याचा प्रसार देखील होतो. राजकारण आणि राज्यव्यवहार यांची प्रभू रामचंद्रांनी कायम केलेली प्रथा व पद्धत जगातील सर्वात आदर्श होती. त्यामुळेच त्यांच्यानंतर २५०० वर्षे म्हणजे महाभारत घडेपर्यंत ती टिकून होती, हेच रामाचे मोठेपण आहे. रामभक्तीच्या भावनेच्या भरात रामायणाचा इतिहास मागे पडू नये. लहानपणी अचूकतेचा व ध्येयनिष्ठेचा संस्कार, कुमारवयात चिकित्सा व कुतूहल आणि मोठेपणी वास्तवाचा शोध घेण्यासाठी रामायण वाचले पाहिजे. रामायण हा इतिहास आहे कारण वाल्मिकींनी रामाच्या ८३ पिढ्यांची नावे त्यात दिली आहे. तरूण पिढीने नगररचना, आरोग्यचिकित्सा, भूगोल, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रांचे ज्ञान अशी विविध पैलूंनी रामायणाचा अभ्यास केला पाहिजे.”

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “रामायणावरील दिनदर्शिका आणि ध्वनिचित्रफित तयार करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे लहानपणी झालेले संस्कार कायम टिकून राहतात. रामायण आणि महाभारत हे खूप मोठे विषय आहेत, त्यांचा खूप अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. राम हा सहनशील होता आणि सहनशीलतेचा कडेलोट झाला तेव्हा कृष्ण उभा राहिला. रामायण आणि महाभारत या केवळ कथा नाहीत. त्यातील अनेक मूल्ये जीवनात आचरणात आणण्यासारखी आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. सुधीर गाडे यांनी केले.