Month: March 2020

पुणे, दि. ७ : “देश आणि राज्यातील राजकीय नेतृत्वाने केलेली घोर उपेक्षा, ईशान्य भारताबद्दल असलेल्या अज्ञानातून देशाच्या अन्य भागात मिळणारी परकेपणाची वागणूक ते गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने आत्मीयतेच्या भावनेतून वेगाने केलेला विकास हा देशाच्या ईशान्येकडील राज्यांचा प्रवास आहे. तिकडच्या राज्यांची आणि चार शहरांची नावे माहिती करुन घेण्याची तसदीदेखील आपण घेत नाही. चेहरेपट्टी वेगळी असल्याने आपण त्यांना नेपाळी किंवा जपानी समजतो, त्यामुळे ‘माझ्या देशातच मला परके मानतात’ अशी वेदनेची भावना त्यांच्यात निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमधून आलेल्या नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी मैत्री करा, त्यांची विचारपूस करा, त्यांची भाषा शिकून घ्या कारण, त्यामुळे देश अधिक लवकर जोडला जाईल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने समाजातील विविध मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार तिसरे पुष्प गुंफण्यासाठी ‘माझे ईशान्य भारतातील अनुभव आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाला फार मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच प्राध्यापक, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

“देशातील अन्य भागाप्रमाणेच भारतीय संस्कृतीची साक्ष देणाऱ्या व पौराणिक संदर्भ असलेल्या अनेक खूणा, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, शिल्पे, कथा, श्रद्धा आणि एवढेच काय अंधश्रद्धा देखील ईशान्येकडील राज्यात आढळतात. ईशान्येकडील राज्यांमधील समस्येचे मूळ भारताच्या फाळणीमध्ये आहे. फाळणीचा सर्वात मोठा फटका या भागाला बसला. पूर्व पाकिस्तान अस्तित्वातच आला नसता तर देशाचा हा संपूर्ण भाग अखंड राहिला असता. फाळणीच्या वेळी इंग्रजांनी संपूर्ण ईशान्य भारत मुस्लिमबहुल असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यात सत्यता नसल्याचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि आसामचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ बोरदोलाई यांनी महात्मा गांधीजींना पटवून दिले. त्यामुळे इंग्रजांचा डाव फसला. ईशान्येकडील राज्यांबद्दल आणि तिथल्या जनतेबद्दल केंद्रात सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांना कधीही आत्मीयता नव्हती. त्यामुळेच देशाच्या अखंडतेसाठी झटणाऱ्या बोरदोलाई यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकाचा सन्मान करावा असे त्यांना कधी वाटले नाही. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने १९९९ साली ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. अरुणाचल प्रदेशात ४५ बोली भाषा आहेत. त्यांची कोणतीही लिपी नाही. या भाषा बोलणाऱ्या सर्वांमध्ये संवादाची समान भाषा असावी म्हणून ७० च्या दशकात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल असेलेल के.ए.ए. राजा यांनी हिंदी ही राज्यभाषा म्हणून जाहीर केली. सर्व जनजातींना हिंदी शिकणे सक्तीचे केले. परिणामी अरुणाचल प्रदेशामध्ये आता सर्वजण उत्तम हिंदी बोलतात. संवादाच्या समान भाषेमुळे त्या प्रदेशात देशभक्तीची भावना प्रखर आहे, तिथे दहशतवादाचा प्रश्न निर्माण झाला नाही. ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये मात्र हे घडले नाही. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले किरण रिजीजू हे याच वातारणात मोठे झाले आहेत. त्यामुळे “अरूणाचल हा भारताचा अविभाज्य भाग नसून अरुणाचल प्रदेश हा भारतच आहे” असे ते अभिमानाने म्हणतात. भारताचा मुख्य भूभाग आणि ईशान्येकडील राज्ये असा कोणताही दुजाभाव नाही. त्यामुळे ‘मुख्य राष्ट्रीय प्रवाह’ ही संकल्पना मान्य करण्यासारखी नाही. ईशान्येकडील राज्ये आणि देशाच्या अन्य भागातील राज्ये यांचा राष्ट्रीय प्रवाह एकच आहे. ईशान्य भारतातील परिस्थितीबद्दल देशात गैरसमज दूर करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम आदी संस्थांनी आपल्या सेवाकार्याच्या माध्यमातून केले. प्रसार माध्यमांमधील एका गटाने मात्र हे गैरसमज वाढवण्याचेच काम केले. अटलबिहारी वाजपेयी सरकारने देशाच्या चारही दिशांना जोडणाऱ्या ‘सुवर्ण चतुष्कोन’ या महामार्ग बांधणीच्या कार्याची सुरुवात आसाममधील सिल्चरपासून केली. आदिवासी विकासासाठी आणि ईशान्य भारतासाठी पहिल्यांदा स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले. प्रत्येक केंद्रीय मंत्रालयाने त्यांच्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या १० टक्के रक्कम त्यासाठी देण्याचा नियम केला. नरेंद्र मोदी सरकारने या ‘लूक ईस्ट’ धोरणाचे रुपांतर ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणात केले. त्यामुळे ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचा विकास फार वेगाने होतो आहे. ‘हायवेज, आयवेज, रोडवेज आणि एअरवेज’ यांच्या विकासामुळे संपर्क प्रचंड वाढला आहे. त्यामुळे दक्षिण आशियातील देशांमध्ये निर्यातीची संधी देखील उपलब्ध झाली आहे. ईशान्य भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी देशाच्या विविध भागात जातात. या विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने केवळ सहा महिन्यांत बंगळूरुपर्यंत सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी सुरु केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साडेपाच वर्षांच्या काळात तब्बल ४० वेळा ईशान्येतील राज्यांमध्ये एक रात्र राहिले आहेत. सर्व केंद्रीय मंत्र्यांना दर १५ दिवसांनी दौरा करुन या भागाच्या विकासात लक्ष घालण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून असे कधीच घडले नव्हते. केंद्र सरकारच्या या कृतीतून ईशान्य भारताबद्दल असलेली आत्मीयता दिसून येते,” असे देवधर यावेळी म्हणाले.

सुधीर गाडे यांनी सुनील देवधर यांचा परिचय करुन दिला तर डॉ. व्हनकटे यांनी आभार मानले.
डॉ. रवींद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.