शालेय स्तरापासून ‘कौशल्यवाद’ निर्माण करण्याची गरज – डॉ. शिकारपूर

पुणे, दि. ३१ : “विकसित देशांमध्ये शिक्षण म्हणजे कौशल्य प्रशिक्षण अशीच मान्यता आहे. आपल्याकडे क्रमिक अभ्यासक्रमावर भर देण्यात येतो, प्रत्यक्षात कौशल्य प्रशिक्षण अनिवार्य करण्याची आवश्यकता आहे. भारतात असलेली बुद्धिमत्ता आणि भारताकडे असलेले तंत्रज्ञान यांच्यामुळेच भविष्यातील भारत निर्माण होणार आहे. त्यामुळे भारतात शालेय स्तरापासूनच ‘कौशल्यवाद’ निर्माण करण्याची गरज आहे. भारत सरकारने सुरू केलेली ‘डिजिटल इंडिया’ ही मोहिम देशात तळागाळापर्यंत पोहोचली आहे. मोबाईल फोनचा सर्वाधिक वापर करणारा भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे मोबाईल फोनची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या तंत्रज्ञांची फार मोठ्या संख्येने गरज आहे. ‘सेवा-श्रम इलेक्ट्रॉनिक रिपेअर सेंटर’ या कौशल्य प्रशिक्षण प्रकल्पाच्या माध्यमातून असे तंत्रज्ञ निर्माण होतील,” अशी अपेक्षा ज्येष्ठ संगणक तज्ञ व शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. दीपक शिकारपूर यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय (पूर्वीचे भावे स्कूल) आणि ॲस्पायर नॉलेज अँड स्कील्स इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीनटेक इनोव्हेशन हब’अंतर्गत ‘सेवा-श्रम इलेक्ट्रॉनिक रिपेअर सेंटर’ हा कौशल्य प्रशिक्षण प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन डॉ. शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्याच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक चंद्रकांत निनाळे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. म. ए. सो. च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
म. ए. सो.च्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील, ॲस्पायर नॉलेज अँड स्कील्स इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष डॉ. संजय गांधी, ‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेचे संस्थापक राज देशमुख, म. ए. सो. मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, प्रशालेचे महामात्र सुधीर गाडे आणि प्रशालेचे मुख्याध्यापक सायसिंग वसावे या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. दीपक शिकारपूर पुढे म्हणाले की, परिक्षा हा शालेय शिक्षणातील मोठा शत्रू असून त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे प्रारूप उपयोगात आणणे आवश्यक आहे. स्वयं-अध्ययन आणि ग्रंथालयांशी मैत्री हाच उच्च शिक्षणातील मूलमंत्र आहे. भविष्यकाळात भारतातील सरासरी आयुर्मान ९५ वर्षे राहणार आहे. परिणामी आजच्या झेन अल्फा पिढीला निवृत्ती न घेता वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत काम करावे लागणार आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे उद्योग-व्यवसाय त्यांना करावे लागणार आहेत, त्यासाठी आवश्यक असलेल्या १० ते १२ स्वरुपाच्या कौशल्यांची पायाभरणी शालेय स्तरावरच झाली पाहिजे.
चंद्रकांत निनाळे या वेळी बोलताना म्हणाले की, सध्याचा काळ हा निर्मिती आणि दुरुस्ती असा बहुकौशल्याचा आहे. “कौशल्य नसलेला विद्यार्थी म्हणजे पंख नसलेला पक्षी” हे वास्तव आहे. कौशल्यविकासामुळे विद्यार्थी स्वावलंबी होत असल्याने त्याचा आत्मविश्वास वाढतो. १४५ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अधिकृत आकडेवारनुसार, मोबाईल फोनची नोंदणी झालेली १२१ कोटी सीमकार्ड आहेत. देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ ५० हजार कोटी रुपयांची आहे. एक स्मार्टफोन साधारणपणे ३ ते ४ वर्षे टिकतो. त्याची देखभाल व दुरुस्ती करणारी ३ लाख दुकाने आज कार्यरत आहेत, १५ ते २० लाखांपर्यंत ही दुकाने वाढण्यास वाव आहे. फारसे भांडवल नसताना सुद्धा करता येणारा हा व्यवसाय आहे. मात्र, त्यामध्ये विश्वासार्हता फार आवश्यक आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. संजय गांधी म्हणाले की, ज्ञान हे देता येते पण कौशल्य हे आत्मसात करावे लागते. ‘सेवा-श्रम इलेक्ट्रॉनिक रिपेअर सेंटर’ द्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही केवळ एक प्रयोगशाळा नाही तर त्यामाध्यमातून सूक्ष्म स्तरावर काम करणारे उद्योजक घडवायचे आहेत. प्रत्यक्ष कार्यानुभवाला आम्ही कायम प्रोत्साहन देतो. सेवा आणि श्रमाची प्रतिष्ठा राखणारे कौशल्य निर्माण करून विद्यार्थ्यांना उत्पन्न मिळवून देणाचा हेतू या प्रकल्पामागे आहे. त्याच्या विस्तारासाठी ‘सीएसआर’ निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब शिंदे म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वस्ती विभागातील आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळीतेच प्रमाणदेखील जास्त आहे. कौशल्यविकासामुळे या विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल आणि ते रोजगारक्षम होतील. मएसो मुलांचे विद्यालय (भावे स्कूल) हे भविष्यात ‘टेक्नो स्कूल’ म्हणून नावारुपाला यावे याची जबाबदारी प्रामुख्याने शाळेतील शिक्षकांची आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांनी ममत्वाने बघावे.
मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सोनाली चौधरी यांनी आभारप्रदर्शन केले.
