“नैतिक मूल्यांच्या आचरणातूनच देश महान होईल”

“ स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे आज चारित्र्य घडविणारे शिक्षण हवे आहे, त्यासाठी नैतिक, आध्यात्मिक व मानवी मूल्यांचा समावेश शिक्षणात असण्याची आवश्यकता आहे आणि ही मूल्य आचरणात आणली तर आपला देश निश्चित महान होईल,” असा विश्वास पुण्याच्या रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंद यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ आयोजित करण्यात येतो. मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि. १२ जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी आयर्नमॅन खेळाडू अनिरुद्ध तोडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, संस्थेचे साहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य विजय भालेराव, म.ए.सो. क्रीडा वर्धिनीचे महामात्र सुधीर भोसले उपस्थित होते. 

स्वामी श्रीकांतानंद पुढे म्हणाले की, “महान होण्यासाठी आत्मविश्वास, सेवेचा भाव आणि सत्याचे पालन करण्याची वृत्ती यांची आवश्यकता असते. स्वतःवर आणि देवावर विश्वास असेल तर आपण कोणतेही महान कार्य करू शकतो. जे इतरांसाठी जगतात ते खरे जिवंत असतात असे स्वामी विवेकानंद म्हणत. त्यांचे विचार ऐकून भगिनी निवेदितांनी आपले जीवन भारतासाठी समर्पित केले. दुर्दैवाने परकीयांना जे कळते ते आजही आपल्या लक्षात येत नाही. आज आपल्या देशामध्ये खूप जणांना सेवेची गरज आहे. सत्य कोणापुढेही मान तुकवायला तयार नसते, जो समाज सत्याचे पालन करत नाही तो समाज नष्ट होतो. स्वामी विवेकानंदांनी आयुष्यभर सत्याचीच कास धरली आणि त्याच सत्याने त्यांना महान बनवले. त्यांनी वाणीच्या आधारेच जग जिंकले. आपल्या जीभेवर सरस्वतीचा वास असतो, त्यामुळे आपण बोलण्यातून लोकांची मने जिंकायची असतात, दुखवायची नसतात. त्यासाठी चांगले साहित्य वाचले पाहिजे व चांगला विचार केला पाहिजे. तुमच्यामध्ये सर्व शक्ती विद्यमान आहेत, त्यामुळे तुम्ही कोणतेही कार्य करू शकता, स्वतःला दुबळे समजू नका असे स्वामी विवेकानंद म्हणत असत आणि हेच यशाचे खरे सूत्र आहे.” 

प्रमुख पाहुणे अनिरुद्ध तोडकर आपल्या भाषणात म्हणाले, “मलेशियात झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मला मिळालेले यश मी भारतीय सेनादलांना समर्पित करतो कारण त्यांनी केलेला त्याग फार मोठा आहे आणि आपण त्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही यश मिळवण्यासाठी मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सुदृढ असणे गरजेचे असते. पालक व शिक्षकांकडून लहानपणापासून होणारे संस्कार आणि शिकवण यातूनच कोणतीही व्यक्ती मानसिकदृष्ट्या सुदृढ होते. माझ्यावर झालेल्या संस्कारातूनच मी कायम काही मूल्य जोपासत आलो आहे, त्यातून माझे विचार तयार झाले आहेत. आपल्या भोवती जेव्हा सकारात्मक व्यक्ती असतात तेव्हा सकारात्मक वृत्ती वाढते. स्पर्धेदरम्यान मनातले सकारात्मक विचार जेव्हा नकारात्मक होऊ लागत तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांच्या आधारे त्यावर मात करता आली. आयर्नमॅन स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या शारिरीक सरावाबरोबरच मनातील सकारात्मक विचारांच्या आधारे मला यश मिळू शकले.” 

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात युवा चेतना दिन साजरा करण्यामागील भूमिका विषद केली. संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शिरवळ, सासवड, बारामती आणि नगर येथील शाळांमधील ५६८ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी क्रीडा प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये योगासने, ढोलपथक, मल्लखांब, अरोबिक्स, लेझिम, मनोरे, वारी, गोफ विणणे, मर्दानी खेळ आदी प्रात्यक्षिकांचा समावेश होता. शालेय विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांना सांघिक वृत्ती, समन्वय आणि खिलाडूवृत्ती यांचे दर्शन घडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *