पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनातील प्रदर्शनाचे उदघाटन

 

पुणे – अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, देशभरातील संशोधन संस्थांच्या कार्यासह देशातील पारंपरिक ज्ञानाची ओळख करून देणाऱ्या भारतीय विज्ञान संमेलनातील प्रदर्शनाचे उदघाटन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे गुरुवारी (ता. ११) केले. ‘देशभरातील संशोधन संस्थांनी केलेले संशोधन कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून, विज्ञान भारतीच्या विज्ञान संमेलनाच्या माध्यमातून हे कार्य देशभर पोहोचत आहे. भारताला पारंपरिक ज्ञानाचा मोठा वारसा लाभलेला असून, आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक ज्ञानाच्या संगमातून संशोधनाच्या नव्या संधी निर्माण होतील,’ असे विचार सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ संदेशातून मांडले. एक्स्पोच्या उदघाटनाला विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, महासचिव ए. जयकुमार, संघटनमंत्री जयंत सहस्रबुद्धे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेसचे संचालक डॉ. शेखर मांडे, डीआरडीओच्या एसीई विभागाचे महासंचालक डॉ. पी. के मेहता, संमेलनाचे संयोजक मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संमेलन आणि प्रदर्शनाची सहप्रायोजक आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर, भारत ५२ हॉवित्झर तोफ यांसह डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, तसेच भारतातील पारंपरिक व्यवसायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष सादरीकरण हे एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे. केंद्रीय विज्ञान- तंत्रज्ञान मंत्रालय, भूविज्ञान मंत्रालय, कौन्सिल फॉर सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या संशोधन संस्थांचा सायन्स एक्स्पोमध्ये सहभाग आहे. सायन्स एक्स्पो येत्या रविवारपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाचे उदघाटन शुक्रवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एम. एम. शर्मा यांचे बीजभाषण होईल. संमेलनामध्ये देशभरातून आलेले संशोधक इंग्रजीप्रमाणेच भारतीय भाषांमधून आपले संशोधन सादर करणार आहेत. विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या संस्थांचे दालनांना नागरिक आवर्जून भेट देत आहेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचीदेखील या संमेलनात B10 आणि B11 अशी दोन दालने आहेत. आज पहिल्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. स्वांतरंजन, केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य मा. मधुभाई कुलकर्णी, संघाचे पुणे महानगराचे मा. संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी मएसोच्या दालनांना भेट दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *