मंतरलेल्या दिवसांच्या स्मृति जपणारा ‘मएसो’चा स्नेहमेळावा

शाळेतल्या बाईंना आणि सरांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, कॉलेजमधल्या मंतरलेल्या दिवसांचा आठव, वडाच्या पाराच्या साक्षीनं अनुभवलेले संवेदनशील क्षण, कट्ट्यावर केलेला कल्ला, हॉस्टेलवर जमलेलं मैत्र, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा धांडोळा घेताना मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा ह्द्य वातावरणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आज मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर रंगला! निमित्त होतं, संस्थेच्या १५८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचं!
यात कोण नव्हतं? शिक्षण, क्रीडा, आरोग्यसेवा, व्यावसायिक, उद्योजक, राजकारण, पत्रकारिता, प्रशासन, संरक्षण अशा विविध क्षेत्रातल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या स्नेहमेळाव्यात सहभागी होऊन आपल्या शालेय-महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या शिक्षक, शिक्षिकांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
संस्थेचे अध्यक्ष भूषण गोखले यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून या स्नेहमेळाव्याला सुरवात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव प्रा. सुधीर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
एन.व्ही.अत्रे, सी.पी.चिंचोरे, श्री.वा. कुलकर्णी, माजी प्राचार्य डॉ. अरविंद इनामदार, माजी मुख्याध्यापिका लीला कुलकर्णी, मा.तु. रोमण-जाधव, माजी मुख्याध्यापक एस.व्ही. मारणे यासारखे माजी शिक्षक-प्राध्यापक-प्राचार्य या वेळी आवर्जून उपस्थित
होते. शिक्षक-विद्यार्थ्यांमधल्या स्नेहसंवादाने प्रत्येकाच्या मनातल्या जुन्या आठवणींचा कोपरा आपोआप उघडला गेला.
संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. न. म. जोशी, प्रा. अ. ल. देखमुख, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया आणि त्यांचे कुटंबीय, अँड. दादासाहेब बेंद्रे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, नेत्रतज्ञ डॉ. श्रीकांत केळकर, ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख, खा. अनिल शिरोळे, आ. विजय काळे, आ. मेधाताई कुलकर्णी, डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, सुनील माळी, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शकुंतला खटावकर, ज्येष्ठ खो-खोपटू हेमंत टाकळकर, विजय अभ्यंकर, कर्नल अनंत गोखले, डॉ. माधवी कश्यप, किरण जोशी, संस्थेच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, बद्रीनाथ मूर्ती, माजी प्रबंधक अनिल ढेकणे असे अनेक मान्यवर या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला इ.स. 2020 मध्ये 160 वर्ष पूर्ण होणार आहेत. शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या ‘मएसो’नं मूलभूत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक आणि कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमांनाही तितकंच महत्व दिलं आहे. 1990 सालपर्यंत 7 शाळा आणि 2 महाविद्यालयांच्या माध्यमातून शिक्षणाचा संस्कार देणाऱ्या ‘मएसो’चा विस्तार आता 71 शाखांद्वारे 7 जिल्ह्यात झाला आहे. याची माहिती देणारी विविध दालनं या स्नेहमेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आली होती. आपल्या संस्थेचं हे कार्य बघून उपस्थित भारावून जात होते. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी संस्थेच्या प्रयत्नांमध्ये आपलाही सहभाग असावा यासाठी अनेक माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांनी उत्सफूर्तपणे ‘विद्यादान निधी’देखील दिला.
आपल्या जीवनाला दिशा देणारे शिक्षक, शाळा, संस्था यांच्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करत प्रत्येक जण या स्नेहमेळाव्याच्या आठवणी मनात साठवत होता.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *