म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल ला राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक

म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हैदराबाद येथे रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या अंतिम फेरीत शाळेच्या संघाने हे यश मिळविले आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री मा.आर. के. सिंह, पी. गोपीचंद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

या स्पर्धेत शाळेच्या संघाने हिंदी विभागात “फिर आज भुजाएँ फडक उँठी, हम पर प्रहार करनेवाले चिंता करें अपने प्राणों की…” हे गीत सादर केले. संस्कृत विभागात भारतभूमीची महती सांगणारे “जयतु जननी जन्मभूमी पुण्यभुवनं भारतं…” हे गीत तर लोकगीत विभागात महाराष्ट्रातील कोळी-धनगर गीते व भारुड, गोंधळ यांची शृंखला सादर केली. शाळेच्या विद्यार्थ्यांचे सूर आणि तालबद्ध सांघिक गायन ऐकून सभागृहातील श्रोते भारावून गेले आणि त्यांनी नकळत तालदेखील धरला. 

राष्ट्रीय भारत विकास परिषद या संस्थेतर्फे संस्कृत, हिंदी आणि लोकगीत अशा तीन विभागात जिल्हा, राज्य, प्रांत आणि त्यानंतर राष्ट्रीय अशा चार स्तरांवर ही स्पर्धा घेतली जाते. प्रत्येक स्तरावरप्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघाचीच पुढील स्तरावरील स्पर्धेसाठी निवड केली जाते. संपूर्ण भारतातून पाच हजार शाळांमधील संघ या स्पर्धेत सहभागी होतात. त्यातून केवळ ७ शाळांच्या संघाची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली होती. 

अतिशय स्पर्धात्मक कसोट्यांवर झालेल्या या स्पर्धेत मएसो बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विजेतेपद मिळवून स्पर्धेवर शाळेची आणि महाराष्ट्राची मोहोर उमटविली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली बोधनकर व शिक्षिका सौ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळविले आहे.

Click Here For the Video

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *