स्वयंसिध्दा प्रकल्प – रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेस

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसमध्ये चालू असलेल्या ‘स्वयंसिध्दा’ या प्रकल्पामध्ये एकूण २६ महिलांनी त्यांच्या आवडीचे व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी १४ महिलांचा प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या महिलांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याबरोबरच त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयालयातील मा. न्यायाधीश रेवती मोहिते यांच्या हस्ते संस्थेला गौरविण्यात आले. या ‘स्वयंसिध्दां’नीही आपल्या मनोगतात संस्थेमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात झालेल्या सकारात्मक बदलामध्ये मोलाचा वाटा कसा आहे याचा वारंवार उल्लेख केला.

कौटुंबिक न्यायालय या महिलांची निवड करून त्यांना मएसो रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसकडे पाठवते. या सर्व महिलांची घटस्फोटाची प्रक्रिया सुरु असते आणि त्या आपली हक्काची पोटगी मिळण्याची प्रतिक्षा करत असतात. या सर्व परिस्थितीत त्या मानसिक, भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या खचलेल्या असतात. यातील बहुतेक जणींना कुटुंबाचा आधार नसतो. समाजातही त्यांना अवहेलना सहन करावी लागते. मएसो रेणुका स्वरुप इन्स्टिट्यूट ऑफ करिअर कोर्सेसचे कार्य महिलाकेंद्रित असल्याने त्यांना इथे अतिशय कमी शुल्क घेऊन कौशल्य प्रशिक्षण तर दिले जातेच पण त्याबरोबर त्यांना फार मोठा भावनिक आधारही मिळतो. त्यामुळे त्यांनीच शिवलेले विविध वेष परिधान करून त्या मोकळेपणाने ‘रॅम्प वॉक’ करतात इतका आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो.

अशा या ‘स्वयंसिद्धा’ प्रकल्पासाठी रोटरी क्लबने आर्थिक साहाय्य केले आहे.