मएसो मुलांचे विद्यालयातील ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळेचे’ उद्घाटन

पुणे, दि. ९ – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील (पेरुगेट भावेस्कूल) नूतनीकृत संगणक प्रयोगशाळेचे ‘कै. प्रभाकर चानसरकर संगणक प्रयोगशाळा’ असे नामकरण आणि उद्घाटन सोमवार, दि. ९ एप्रिल २०१८ रोजी श्रीमती शिल्पा प्रभाकर चानसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक श्री. संग्राम खामकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संस्थेचे सचिव डॉ. संतोष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर, शाळेचे महामात्र व संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा. सुधीर गाडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ, तसेच खामकर कुटुंबिय आणि आप्तेष्ट यावेळी उपस्थित होते. 

श्रीमती शिल्पा चानसरकर यांच्या वतीने त्यांच्या भगिनी सौ. अपर्णा विनायक आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “कै. प्रभाकर चानसरकर यांचे व्यक्तिमत्व अतिशय चैतन्यमयी आणि प्रेरणादायी होते. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीचा आलेख कायमच चढता होता. ते सर्वांना कायमच गरजेप्रमाणे मदत करत असत आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देत. जगाच्या पाठीवर कुठेही उपचार होणार नाहीत असा डोळ्यांचा विकार झाल्यावरदेखील ते खचले नाहीत, त्यांनी अतिशय खंबीरपणे आपल्या शारिरीक व्याधींना तोंड दिले. कै. प्रभाकर चानसरकर यांचे संगणक या विषयात प्रावीण्य होते. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ शाळेतील संगणक प्रयोगशाळेसाठी देणगी दिली आहे.”

उद्योजक श्री. संग्राम खामकर हे देखील शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या भाषणात शाळेतील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “१९८६ साली शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक दाखवण्यासाठी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा संगणक बघण्याची संधी मिळाली आणि आज शाळेतील संगणक प्रयोगशाळेच्या उद्धाटनाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, याचा मोठा आनंद होतो आहे. श्रीमती शिल्पा चानसरकर यांनी अतिशय योग्य ठिकाणी देणगी दिली आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात संगणक शिकायला मिळाल्यामुळे पुढील जीवनात त्यांना त्याचा खूप उपयोग होईल.” 

संस्थेच्या माहिती तंत्रज्ञान व तंत्रशिक्षण समितीच्या अध्यक्ष आणि संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य सौ. आनंदी पाटील यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याचा परिचय करून दिला. त्या म्हणाल्या, “संस्थेने काळाची पावले ओळखून आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आव्हानात भावे स्कूलसारखी शाळा टिकून आहे. अनेक दिग्गज, नामवंत या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. शाळेबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेतूनच माजी विद्यार्थी शाळेला वेळोवेळी पाठबळ देत असतात. कै. प्रभाकर चानसरकर यांच्या स्मरणार्थ मिळालेली देणगी हे त्याचेच उदाहरण आहे.” 

कार्यक्रमाच्या सुरवातीला आपल्या प्रास्ताविकात श्री. गाडे यांनी, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून मिळत असलेल्या देणग्यांचा आढावा घेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दानशूर व्यक्तींच्या पाठबळामुळेच आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत संस्था मराठी माध्यमाच्या शाळा चालवू शकत असल्याचे सांगितले. 

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर यांनी कै. प्रभाकर चानसरकर यांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. 

श्री. गाडे यांच्या हस्ते श्रीमती शिल्पा चानसरकर, श्री. खामकर आणि सौ. आनंदी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील पर्यावेक्षिका सौ. भारती तांबे यांच्या हस्ते चानसरकर कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमळ यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *