Month: March 2018

म.ए.सो. क्रीडावर्धिनीने दिनांक २७ ते २९ मार्च २०१८ या कालावधीत संस्थेच्या विविध शाळा / महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे निवासी क्रीडा मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासारआंबोली येथे पार पडलेल्या या शिबिरात एकूण ५४ शिक्षकांनी भाग घेतला. त्यात १५ महिला व ३९ पुरुष शिक्षकांचा समावेश होता. शिबिराचे उद्घाटन मंगळवार, दि. २७ मार्च रोजी म.ए.सो.च्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य प्रा.सुधीर गाडे यांच्या हस्ते तर आजीव सदस्य मंडळाचे अन्य एक सदस्य प्रा.गोविंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे यांनी केले तर क्रीडावर्धिनीचे महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी आभार मानले. 

दि. २८ मार्च रोजी सकाळच्या सत्रात श्री.मनोजकुमार साळी, श्री.राजेंद्र लोखंडे व श्री. दादा शिंदे यांनी सूर्यनमस्कार, योगासनांविषयी मार्गदर्शन केले. 

श्री.शिरीष तिखे यांनी ओंकार व प्राणायाम यांची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. 

डॉ. निलेश मसुरकर यांनी अष्टांग योग याविषयी मार्गदर्शन केले.

श्री. मनोजकुमार साळी यांनी आवर्तन ध्यान घेतले.

श्री.मयुरेश डंके यांनी मानसशास्त्रीय तंत्रे याविषयी मार्गदर्शन केले.

भोजनानंतर दुपारच्या सत्रात प्रा. महेश देशपांडे व प्रा.शिरीष मोरे यांनी ‘मास अथलेटिक्स’ या विषयी प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले.

श्री. जयसिंग जगताप व श्री. दादा शिंदे यांनी सांघिक खेळ घेतले.

सायंकाळच्या सत्रात सैनिकी शाळेचे कमांडट कर्नल सारंग काशीकर (निवृत्त) यांनी प्रात्यक्षिकाद्वारे रायफल शूटिंगबाबत माहिती दिली.

रात्री भोजनानंतरच्या सत्रात नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकास या विषयावर कर्नल काशीकर यांचे व्याख्यान झाले.

दि.२९ रोजी सकाळच्या सत्रात श्री. मनोज साळी यांनी ओंकार, सूर्यनमस्कार व योगासने घेतली. 

आगाशे महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. काळे या विद्यार्थिनीने एरोबिक्स या विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

श्री.सुनील देसाई यांनी मानवी मनोरे (पिरॅमिड) ची माहिती प्रत्यक्षिकांद्वारे दिली.

श्री.दादा शिंदे यांनी हास्य योगाचे प्रशिक्षण दिले. 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव डॉ.भरत व्हनकटे यांच्या मार्गदर्शनाने व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन आंबर्डेकर यांचे उपस्थितीत या शिबिराचा समारोप झाला. यावेळी प्रा. शैलेश आपटे शिबिरातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. समारोपप्रसंगी प्रा. सुधीर भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. 

या संपूर्ण शिबिराची धुरा प्रा.शैलेश आपटे, प्रा.सुधीर भोसले व श्री.मनोज साळी यांनी सांभाळली. 

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व कर्मचारी वृंदाचे संपूर्ण सहकार्य लाभले.

 

 

म ए सो वाघीरे विद्यालयाचा ११२ वा वर्धापन दिन दि. २६ मार्च २०१८ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वांना शाळेची माहिती सांगितली. कु. प्रणाली कापरे हीने स्वरचित कविता सादर केली. प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. कारंडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेचा इतिहास सांगितला.

आपल्या विद्यालयातील १९५६ सालचे माजी विद्यार्थी आणि सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री. बापूसाहेब नानासाहेब जगताप हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते स्वतः प्रगतशील शेतकरी असून बी.ए. एल.एल.बी. पर्यंत त्यांचे उच्च शिक्षण झाले आहे. आपल्या भाषणात श्री. जगताप यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शाळेत आमच्यावर उत्तम संस्कार झाले, त्यामुळे आम्ही जीवन यशस्वीरीत्या जगू शकलो असे त्यांनी सांगितले. सासवडच्या कोर्टात काम करत असताना आयुष्यभर सायकलचा वापर केल्यामुळे आज ८५व्या वर्षीही आपण व्यवस्थित आहोत असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगतले. नगराध्यक्ष असताना त्यांनी विद्यालयाला पालिकेमार्फत देणगी दिली होती. श्री. जगताप यांचे वडीलही सासवड नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. 

यावेळी हिंदी कथाकथन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचे वाचन श्री. आप्पासाहेब कोकरे यांनी केले. 

श्री. सहारे सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश पाठक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. एम. के. राऊत व श्री. रा. ब. जगताप यांनी सहकार्य केले.

 

विद्यार्थ्यांमध्ये ‘दातृत्व’ या गुणाची जोपासना व्हावी या हेतूने आपल्या विद्यालयात एकमुष्टी धान्य योजना राबविण्यात येते. या योजनेत जमा झालेले धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास या संस्थेस प्रदान करण्याचा कार्यक्रम शनिवार, दि. १० मार्च २०१८ रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यातील स्वरुपवर्धिनी या संस्थेचे कार्याध्यक्ष मा. रामभाऊ डिंबळे होते. तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे सचिव मा. मंदार अत्रे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सचिन आंबर्डेकर तसेच तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाचे व्यवस्थापक मा. रमेश आंबेकर हेदेखील या वेळी उपस्थित होते. 

मा. डिंबळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडत तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे व अनुभव सांगत दातृत्व गुणाचे महत्व स्पष्ट केले. मा. अत्रे यांनी तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासाचे विविध उपक्रम आणि योजना यांची माहिती दिली. मा. आंबर्डेकर यांनी एकमुष्टी धान्य गोळा केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक एस.बी. कुलकर्णी यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक रामदासी यांनी करून दिला. विद्यालयातील शिक्षक विनोद पारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री. जगताप सरांनी आभार प्रदर्शन केले. 

आपल्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी तसेच पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी एकमुष्टी धान्य योजनेअंतर्गत धान्य गोळा केले. संकलित केलेले हे धान्य तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यासातर्फे वेल्हा येथे चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहाला देण्यात आले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघीरे विद्यालयात ‘जागतिक महिला दिना’निमित्त आज सासवड नगर पालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय कौटुंबिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण देणाऱ्या आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचा विशेष सत्कार देखील या वेळी करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधत शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थिनी प्रतिनिधींचाही सत्कार आज करण्यात आला. यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी महिला दिनाची माहिती सांगितली. 

सासवड शहर आणि विशेषतः शाळेच्या आसपासच्या परिसरात स्वच्छता राखण्याचे काम पालिकेच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचारी करीत असतात. सासवड नगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत भाग घेतलेल्या आणि त्यात उत्तम गुण प्राप्त केलेल्या या महिला कर्मचाऱ्यांचा आजच्या कार्यक्रमात सत्कार करून शाळेने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा. श्री. पी. एस. मेमाणे यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले. 

आपल्या शाळेतील सेविका श्रीमती शारदा सोपान सोळंके यांचे पती आपल्याच शाळेच्या सेवेत होते. त्यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर श्रीमती सोळंके या गेली १८ वर्षांपासून शाळेच्या सेवेत आहेत. त्या मूळच्या जळगाव येथील आहेत. पतीच्या निधनावेळी २ आणि ४ वर्षे वय असलेल्या आपल्या मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने वाढविले. त्यांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन उच्च शिक्षणासाठी प्रेरित केले. त्यांच्या दोन्ही मुलांनी बी.ई. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. या कर्तृत्ववान मातेचा सत्कार करून आपल्यातीलच एका आदर्श महिलेचा परिचय शाळेने या निमित्ताने सर्वांना करून दिला. 

या कार्यक्रमाला पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ. मनिषा बडधे उपस्थित होत्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक गणेश पाठक यांनी केले. 

शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.बी. कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. के. राऊत, हि.बा. सहारे तसेच नगरसेवक आणि शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अजित जगताप यांनी सहकार्य केले