Month: November 2016

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवार, दि. १९ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी ४.०० वाजता कला – क्रीडा संगम आयोजित करण्यात आला होता. दैनिक सकाळ व दैनिक लोकमत या वृत्तपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली आणि छायाचित्रासह वृत्तांकन केले. …

देशाची मान उंचावण्यासाठी प्रयत्न
पुणे : दक्षिण आशियाई स्पर्धांसाठी २००४ मध्ये पाकिस्तानात गेले असताना भारतीय खेळाडूंना अतिशय तुच्छतेची वागणूक मिळाली. पण नेमबाजीतले सुवर्णपदक स्वीकारायच्या प्रसंगी राष्ट्रगीत चालू होताच आपल्या देशाच्या तिरंग्यासमोर पाकिस्तानातले सर्व खेळाडू आणि उपस्थित नागरिक शांतपणे उभे होते. त्याक्षणी मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आपल्यामुळे देशाची मान उंचावली गेली पाहिजे, हीच जिद्द मनात होती. जेव्हा प्रयत्न कमी पडतात तेव्हा असे क्षण आठवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत-दरेकर यांनी आज येथे दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल या शाळेला ८0 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १५६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित कला, क्रीडासंगम या कार्यक्रमाप्रसंगी सावंत यांनी विद्यार्थिनींना हा संदेश दिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, राजीव सहस्रबुद्धे, डॉ. संतोष देशपांडे, मुख्याध्यापिका जयश्री शिंदे, शाला समितीच्या डॉ. केतकी मोडक, अध्यक्ष डॉ. माधव भट उपस्थित होते.
तेजस्विनी म्हणाली, ”घरापासून नेमबाजी शिकण्यासाठी जाताना बसचे भाडेदेखील कसेबसे जमवावे लागत होते. अशा परिस्थितीत माझ्या आईने दिलेला पाठिंबा आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच मी यश मिळवू शकले. शाळेत असताना एनसीसीमध्ये होते. त्यामुळे शूटिंगशी संबंध आला आणि शूटिंग हा माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.”
शूटिंग हा प्रकार दिसतो तितका सोपा नाही, त्यात कमालीची एकाग्रता लागते. तेजस्विनी सावंत आज रोल मॉडेल बनल्या असल्याचे एअर मार्शल भूषण गोखले (नवृत्त) यांनी सांगितले.
कला, क्रीडासंगम या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांमध्ये शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सूर्यनमस्कार आणि योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सामूहिक नृत्य, साधन कवायत, कराटे, ८0 विद्यार्थिनींच्या घोषपथकाच्या विविध रचना सादर केल्या.