योगासनपटू कु. श्रेया कंधारे हिचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव

दक्षिण कोरियामध्ये झालेल्या नवव्या आशियाई योग विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल मुळशीतील रहिवासी व आंतरराष्ट्रीय योगासनपटू कु. श्रेया शंकर कंधारे हीचा म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्रेया हीची आई सौ. वर्षा कंधारे यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. नंदुशेठ भोईर, श्री. सुभाष शिंदे, श्री. महादेव काटे, माणचे माजी उपसरपंच श्री. तानाजी पारखी, श्री. सूर्यकांत साखरे, श्री. नितिन विधाते, शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री. संदीप पवार हे उपस्थित होते.

याप्रसंगी सैनिकी शाळेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींना प्राचार्या डॉ. सुलभा विधाते व कु. श्रेया कंधारे यांच्या हस्ते रँक देण्यात आली. यानंतर कु. श्रेया हिने सादर केलेल्या योगासनांची प्रात्यक्षिके बघून सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक अचंबित झाले.

आपल्या मनोगतामध्ये कु्. श्रेया हिने रोजचा ८ ते १० तास सराव, आई-वडिल, शिक्षक, मार्गदर्शक, डॉक्टर यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी कु. श्रेया हिच्यासारखे खेळाडू आपले आदर्श असले पाहिजेत असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख श्री. संदीप पवार व श्री. शाम नांगरे यांनी केले.