‘शौर्य’ शिबिर उत्साहात संपन्न

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेले ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या पारितोषिक वितरण समारंभाला म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे व महामात्र श्री. सुधीर भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्याम नांगरे व संदीप पवार या प्रसंगी उपस्थित होते.

प्रा. शैलेश आपटे यांनी आपल्या भाषणात, शौर्य शिबिरातून मुलांनी आपण टी.व्ही. व मोबाईलशिवाय देखील दूर राहू शकतो हे सिद्ध केले आहे. मुलांनी मैदानावर रोज किमान २ तास तरी खेळलेच पाहिजे असे सांगितले. या प्रसंगी सर्व शिबिरार्थींचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिबिरार्थी व त्यांच्या पालकांनी देखील या वेळी मनोगत व्यक्त केले.

लहान वयातच साहसाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी शौर्य शिबिरात घोडेस्वारी, रायफल शूटिंग, धनुर्विद्या,ऑबस्टॅकल, वॉल क्लायंबिंग, रोप मल्लखांब इ. साहसी क्रीडा प्रकार तसेच शिल्पकला, रांगोळी, वारली पेंटिंग, विविध व्यक्तिमत्व विकसन व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे उपप्रमुख महेश कोतकर यांनी केले तर संदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली लडकत यांनी केले.