महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्ष उद्धाटन समारंभ

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हा आज शिक्षणक्षेत्रातील ब्रँड’

पुणे, दि. २६ : “माणूस हा सजीव असतो तर संस्था ही निर्जिव असते, पण निर्जिव संस्थेच्या कामात प्राण फुंकण्यासाठी पूर्वसुरींनी घेतलेल्या कष्टांमुळे आणि त्यागामुळेच आज शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि तिचे आबासाहेब गरवारे महाविद्यालय हे ‘ब्रँड’ निर्माण झाले आहेत. या महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि इथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असे आज या महाविद्यालयाचे कार्य आहे. गेल्या ७५ वर्षात महाविद्यालयाने केलेल्या यशस्वी वाटचालीची कमान यापुढील काळातदेखील चढती राहावी यासाठी या अमृत महोत्सवी वर्षात सर्वांनीच विचार केला पाहिजे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी आज येथे केले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उद्धाटन समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.  महाविद्यालयाच्या अॅसेंब्ली हॉलमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मएसो’च्या मुख्य कार्यालयातून आणलेल्या मशालीचे स्वागत यावेळी मा. गोखले यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव मा. सुधीर गाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.बी.बुचडे आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाचे सदस्य व समारंभाचे समन्वयक डॉ. अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळेतून महाविद्यालयात जाणे हा एक पार महत्त्वाचा बदल असतो. शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांचे लक्ष असते. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला कल्पना आणि आशा-आकांक्षाचे घुमारे फुटलेले असतात. तो शाळेत शिकलेली शिस्त विसरतो आणि मजा लुटण्याची ओढ त्याला लागते. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे पण आपले लक्ष शिक्षणावरच केंद्रीत केले पाहिजे. आपले ध्येय न सोडणारे विद्यार्थीच पुढे जाऊन जीवनात यशस्वी होतात हे लक्षात घेतले पाहिजे.”

राज्यातील पूरग्रस्तांसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या निधीचा, १ लाख ५१ हजार रुपयांचा पहिला हप्ता यावेळी मा. गोखले यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह श्री. विनायक डंबीर यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.

महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या माहितीपटाचे प्रकाशन मा. गोखले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. तसेच हा माहितीपट तयार करणारे विद्यार्थी आणि अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह तयार करणारा विद्यार्थी प्रसाद किसन चोपडे या सर्वांचा सत्कार देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बुचडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, महाविद्यालयाच्या गेल्या ७५ वर्षातील वाटचालीचा आढावा घेतला. तसेच यापुढील काळात महाविद्यालयात नवनवीन अभ्यासक्रम आणि प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

‘मएसो’ येत्या १९ नोव्हेंबरला १६० व्या वर्षात पदार्पण करत आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा शतकोत्तर हीरक महोत्सव आणि संस्थेच्याच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा अमृत महोत्सव एकाच वर्षात साजरा करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. महाविद्यालय आणि त्याची मातृसंस्था या दोन्हींसाठी ही विशेष घटना आहे, असे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल कुलकर्णी यांनी केले.