पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठीचा निधी रा.स्व. संघ जनकल्याण समितीकडे सुपूर्द

सांगली,कोल्हापूर परिसरातील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी जमा केलेला सुमारे १५ लाख ५० हजार रुपयांचा निधी आज (सोमवार, दि. ९ सप्टेंबर २०१९) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीकडे सूपूर्द करण्यात आला. ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे मा. अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे यांनी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष गणेश बागदरे यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. यावेळी जनकल्याण समितीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह विनायकराव डंबीर, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे सदस्य देवदत्त भिशीकर, ‘मएसो’चे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, ‘मएसो’च्या आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आनंद लेले, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, प्रा. शैलेश आपटे, मएसो कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारुशीला बिराजदार तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना मा. सहस्रबुद्धे म्हणाले की, “दरवर्षी दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती येत असून पुनर्वसनासाठी जनकल्याण समितीच्या निधी संकलनाला ‘मएसो’ प्रतिसाद देते. यापुढे अशा कारणासाठी निधी संकलनाची वेळ येऊ नये. समितीच्या एखाद्या नव्या प्रकल्पासाठी ‘मएसो’ आवश्यक असलेली सर्व मदत करेल.”

सांगली आणि कोल्हापूर भागातील पूरपरिस्थितीत जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची माहिती देताना मा. डंबीर यांनी सांगितले की, ” पूरात अडकलेल्या सांगलीमधील ५० हजार नागरिकांची तर कोल्हापूरमधील ३८ हजार नागरिकांची तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. २००५ साली या परिसरात आलेल्या पूरासारखी परिस्थिती यावर्षी निर्माण होणार नाही अशी नागरिकांची अटकळ होती, त्यामुळे अनेकजण कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याच्या मनस्थितीत नव्हते. पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असलेल्या २३५ नागरिकांचे प्राण वाचविण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, जनकल्याण समिती व रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना यश आले. एका तासात एक हजार फूड पॅकेट्स वाटण्यात आली. सांगली व कोल्हापूरमधील ६ हजार ८०० जणांची १४ केंद्रामध्ये आठ दिवस निवाऱ्याची सोय करण्यात आली तसेच एक लाख पूरग्रस्तांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीत जनकल्याण समितीवर या भागातील आरोग्य व स्वच्छतेची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर स्थानिक तसेच राज्याच्या विविध भागातून सेवाकार्यासाठी आलेल्या सुमारे १५०० कार्यकर्त्यांनी ८ दिवसात स्वच्छेतेचे काम पूर्ण केले. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर होणाऱ्या आजारांचे प्रमाण अतिशय कमी होते. देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला ८५० कार्यकर्त्यांनी एका रुग्णालयात सलग १२ तास स्वच्छता केल्याने ६० खाटांची सुविधा सुरू होऊ शकली. पुनर्वसनाच्या काळात ४७ हजार आपत्तीग्रस्तांवर उपचार करण्यात आले. चारशे गुरांचे जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच एका गावात अडकलेल्या नागरिकांना चार दिवसांनंतर जेवण मिळू शकले. रा.स्व. संघ जनकल्याण समितीने सांगली जिल्ह्यातील चार तालुके व १२ वस्त्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २ तालुक्यांत पुनर्वसनाचे काम करण्याचे ठरविले असून कुरुंदवाडमधील मोडकळीला आलेली शाळा दत्तक घेतली आहे. या कामासाठी जमा झालेला निधी उपयोगात आणण्यात येणार असून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीदेखील त्यांचा सामाजिक कृतज्ञता निधी समितीला देणार आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गाडे यांनी तर आभार प्रदर्शन सचिन आंबर्डेकर यांनी केले.