ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय फळणीकर यांचा सैनिकी शाळेच्या वतीने गौरव

सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक व “आपलं घर ” संस्थेचे संस्थापक श्री. विजय फळणीकर यांचा म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधना फळणीकर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी श्रीमती अरुणा देशमुख, श्रीमती प्रतिभा भट, श्री. नितीन विधाते, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे, श्री.संदीप पवार हे उपस्थित होते.

आपल्या मनोगतात श्री. फळणीकर यांनी सांगितले की, “घरची परिस्थिती खूपच प्रतिकूल असल्याने संघर्ष करावा लागला व त्या संघर्षातूनच आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा मिळाली व त्यामुळेच ‘आपलं घर’ च्या माध्यमातून समाजाच्या सुख – दुखाशी एकरुप होता आले.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्या डॉ. सुलभा विधाते म्हणाल्या की, श्री. विजय फळणीकर यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखेच आदर्शवत आहे. या प्रसंगी लेखक श्री. फळणीकर यांनी स्वतः लिहीलेली सामाजिक जाणीवा जागृत करणारी प्रेरणादायी पुस्तके शाळेला भेट दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती दिपाली आंबेकर यांनी केले तर श्री. अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक श्री. अद्वैत जगधने व पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी ‘गोडबोले ट्रस्ट’च्या अंतर्गत केले.