अभिमान वाढविणारी अभिवादन यात्रा

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी (१६० व्या) वर्षातील पदार्पणानिमित्त ‘अभिवादन यात्रा’ आयोजित करण्यात आली होती. संस्थेच्या पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी असे सुमारे २५०० जण त्यात सहभागी झाले होते. दुपारी २.०० वाजता मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतून या यात्रेला सुरवात झाली. संस्थेतील माजी ज्येष्ठ शिक्षक ना.वा. अत्रे, प्राचार्य सु.मो. शहा, मंगला उकिडवे तसेच ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांचा यावेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे, माजी सचिव प्रा. र. वि. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

मैदानावर ऐकू येणारे ‘मएसो’ गीत ऐकून सान-थोरांची छाती अभिमानाने भरून गेली होती. विद्यार्थी देत असलेल्या संस्थेच्या आणि आपापल्या शाळांच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. मान्यवरांच्या हस्ते ‘फ्लॅगऑफ’ झाल्यावर अभिवादन यात्रेला सुरवात झाली. प्रारंभी संस्थेचे संस्थापक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, वामन प्रभाकर भावे, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमा असलेला आणि संस्थेच्या कार्याची माहिती देणारा चित्ररथ होता. त्यामागे मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींचे पथक होते, त्यामुळे यात्रेला एक प्रकारची शान प्राप्त झाली होती. सैनिकी शाळेच्या घोष पथकाच्या वादनाने सारा आसमंत भारावून गेला होता. या घोष पथकाबरोबरच रेणुका स्वरुप प्रशालेचे घोषपथक आणि सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेच्या ढोल पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रत्येकाच्या मनात अमाप उत्साह होता आणि चेहरे आनंदाने फुलून गेले होते. मार्गावर ठिकठिकाणी विविध संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदार मंडळी, विविध बँका, ‘मएसो’चे माजी विद्यार्थी व हितचिंतक आदींनी चौकांमध्ये रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून यात्रेचे जोरदार स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींमधून नागरिक या यात्रेचे कौतुक बघत होते. यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात ‘सावली’ संस्थेतील विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.

टिळक स्मारक मंदिर – टिळक रस्ता – ग्राहक पेठ – पूरम चौक – बाजीराव रस्ता – शनिपार चौक – नगरकर तालीम चौक – लक्ष्मी रस्ता – कुंटे चौक – उंबऱ्या गणपती चौक – टिळक चौक (अलका टॉकिज) – टिळक रस्ता – साहित्य परिषद चौक – या मार्गाने येऊन मएसो मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) येथे या अभिवादन यात्रेचा समारोप झाला.

या प्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी, अभिवादन यात्रेतील उत्साह बघून ‘मएसो’ची भविष्यातील वाटचाल यशस्वी होणारच अशा विश्वास व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेतील विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा. बुद्धिमत्ता, शारिरिक क्षमता आणि एखादी कला किंवा छंद यांची जोपासना करावी. त्यातून आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते आणि आपण आपल्या देशाला समृद्ध करू शकतो, असा संदेश दिला.